शिर्डी : शिर्डी शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावर असलेल्या ‘निमगाव ‘ या गावात एकाच घरातील पाच जण करोना बाधित सापडले आहेत. त्यात चार वर्षाच्या बलिकेसह दोन पुरुष, दोन महिला यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोसो दूर असलेला करोना शिर्डी नजीक येऊन धडकल्याने परिसर हादरला आहे. यानंतर चौदा दिवस शंभर टक्के लॉकडाऊन घोषित करून संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे.

नगर – मनमाड हायवे लगत आणि शिर्डी शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावर साडेतीन हजार लोकसंख्येचे ‘निमगाव ‘ हे गाव आहे. जगप्रसिद्ध साई मंदिरामुळे भाविकांची मोठी वर्दळ असल्याने शिर्डीच्या हॉटेल व लॉजिंगचा विस्तार या निमगाव गावातही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या गावातील ५० वर्षीय महिलेचा भाजी विक्री व्यवसाय आहे. शेजारच्या राहाता तालुका मार्केट कमिटीच्या घाऊक बाजारातून भाज्या खरेदी करून त्याची विक्री निमगाव येथे त्या करतात. दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलीय. यानंतर राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सर्व २९ जणांना ताब्यात घेतले आहे. भाजी विक्री करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला व एक चार वर्षांची बालिका यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत कोसो दूर असलेला ‘ करोना ‘ आपल्या घराजवळ येऊन धडकल्याने भीतीपोटी शिर्डी परिसर हादरला आहे.

करोनाचे पाच रुग्ण सापडलेल्या ‘निमगाव’ मध्ये चौदा दिवस शंभर टक्के लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. या संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी सात वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. तसेच करोना पॉझिटिव्ह असलेल्या भाजी विक्रेत्या महिलेमुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने राहाता बाजार समितीत काम करणारे आवडते, हमाल, तसेच व्यापारी यांची करोना तपासणी मोहीम तातडीने सुरू केली आहे. तसेच शनिवारपासून बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ‘ला दिली. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. तसेच करोना ला घाबरू नये. त्वरित उपचार करून घ्या. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडावर मास्क बांधा, वारंवार साबणाने हात स्वच्छ करा, सोशल डिस्टन्ससिंग पाळा असं, आवाहनही तहसीलदार कुंदन हिरे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here