अहमदनगर: धार्मिक स्थळे ८ जूनपासून खुली करण्यास केंद्र सरकारने सवलत दिली असली तरी साईबाबांचे शिर्डी शहर पुढील १४ दिवस पूर्ण बंद राहणार आहे. शेजारच्या गावात कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर झाल्याने आणि शिर्डीतही एक रुग्ण आढळल्याने प्रशासन व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.

शिर्डी शेजारील निमगाव मध्ये पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे तेथे १२ जून पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करून गाव सील करण्यात आले आहे. दरम्यान, या गावातील एक बाधित महिला शिर्डीतील तिच्या माहेरी मुक्कामी होती. त्यामुळे शिर्डीतील एका महिलेलाही लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक घेतली. पुढील धोका टाळण्यासाठी चौदा दिवस शिर्डीतील व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

शिर्डीतील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून शिर्डी नगर पंचायत चे कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहेत. शिर्डी व परिसरात करोनाची लागण होऊ नये म्हणून सुरवातीपासून खूप दक्षता घेण्यात येत होती. मात्र तेथे अखेर विषाणूचा शिरकाव झाला. मुख्य म्हणजे मंदिरे खुली करण्याची सवलत दृष्टीपथात असतानाही शिर्डी बंद ठेवण्याची वेळ आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here