वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडले अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे.अकोला : वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडले अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. बुधवारी मुंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही प्रवेश घेवून अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मोठा धक्का बसणार हे निश्‍चित झाले होते. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी ‘वंचित’मधून बाहेर पडत राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्‍चित झाला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोघांचाही प्रवेश लांबल्याने त्यांच्या प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्ये त्यामुळे दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. वंचित बहुजन आघाडीनेही या दोघांच्या प्रवेशात अडचणी निर्माण करण्यात सुरुवात केली होती. त्यामुळे कोरोना व वादळाच्या धोक्यातही अखेर बुधवारी प्रवेशाची अनिश्‍चितता संपवत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल आणि मुंबईतील या राजकीय वादळाचा अकोल्यातील राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला.
मुंबईत राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने या दोन्ही माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सोशल माध्यमांवरून दिली. शरद पवार यांचे सिल्व्हर ओक या बंगल्यावरच हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जंयतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगणराव भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदींची उपस्थिती होती.  

अडीच महिन्यांपूर्वीच ठरले होते
‘वंचित’चा राजीनामा दिल्यानंतर अडीच महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचे निश्‍चित झाले होते. प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने बुधवारी शरद पवार व जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. पुढील वाटचालीबाबत प्रदेशाध्यक्षांच्या अकोला दौऱ्यानंतर निर्णय घेवू.
– हरिदास भदे, माजी आमदार
वंचितमधील वाद ठरले कारणीभूत
वंचित बहुजन आघाडीमध्ये पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद सुरू झाले होते. त्यातूनच दोन माजी आमदारांनी वंचित बहुजन आघाडी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाबाबत माहिती मिळाल्यामुळेच 31 मे रोजी वंचित बहुजन आघाडीतील वादासंदर्भात कार्यकर्त्यांवर कारवाईचा बगडा उभारणारे पत्र काढण्याची आल्याची चर्चा आहे. जेणे करून या दोन माजी आमदारांसोबत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर वचक बसावा, हा या पत्रामागील उद्देश असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here