श्रीरामपूर ( वार्ताहर ) श्रीरामपूर येथील वसुंधरा वृक्ष संवर्धन समिती व महाले पोदार लर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अंतराचे पालन करून शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले .श्रीरामपूर येथील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास अग्रेसर असलेले महाले प्रतिष्ठान हे एक नामांकित असे प्रतिष्ठान आहे. महाले प्रतिष्ठान संचलित महाले पोदार लर्न स्कूल हे विविध बहारदार वृक्षांनी नटलेले आहे .नैसर्गिक हिरवळीने नटलेले महाले पोदर स्कूल हे श्रीराम पुराची शान असल्याचे गौरवोद्गार श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांनी काढले .जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांच्या शुभ हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की, महाकवी , थोर शिक्षणतज्ञ रवींद्रनाथ टागोर यांच्या शिक्षण विषयक विचारांकडे बघितले असता रवींद्रनाथ टागोरांनी नेहमीच शिक्षण प्रक्रियेमध्ये निसर्गाला विशेष महत्त्व दिले आहेत .निसर्गामध्ये विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रक्रिया ही अधिक सुलभ होते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानानुभव मोठ्या प्रमाणात मिळत असतात . याच विचारांचा वसा व वारसा आपल्या दृष्टीपुढे ठेवून अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हिरे – सोन्याचे व्यापारी बंधू श्री सचिन प्रकाश महाले व श्री अमोल प्रकाश महाले यांनी श्रीरामपुराच्या उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रसन्न , शांत , प्रेरणादायी निसर्गाच्या सानिध्यात वैज्ञानिक विचारांवर तसेच आदर्श मानवी मूल्यांवर आधारित शिक्षण देणाऱ्या आदर्श अशा स्कूलची स्थापना केली आहे . तसेच आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संवर्धन व संरक्षण केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले .
श्रीरामपूर येथील वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीच्या संस्थापक अध्यक्षा सौ.निता डबीर यांनी मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व आपल्या मनोगतात सविस्तरपणे विशद केले .शाळेच्या प्राचार्या सौ श्वेता गुलाटी यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे व त्यावरील उपाय आपल्या मनोगतातून व्यक्त करून वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीने वृक्षरोपण करण्यासाठी आपल्या शाळेची निवड केल्याबद्दल विशेष आभार मानले .
या प्रसंगी नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीच्या संस्थापक अध्यक्षा सौ. नीता डंबीर , विद्यमान अध्यक्षा सीमाताई जाधव , सदस्य सुरेखा कडुसकर , सौ .गांधी, शौर्य डंबीर आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्राचार्या श्वेता गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली तसेच संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री सचिन प्रकाश महाले सचिव श्री अमोल प्रकाश महाले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूञसंचलन शिक्षक श्रीकांत लांडे यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here