अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे. पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिका-यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते.
त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले.
तसेच शेतक-यांच्या बांध्यावर देण्यात येणारे बी-बियाणे योग्य वेळेत पोहचू द्या व कापूस, हरभरा, मका, तूर आदीं धानाची खरेदी गतीने करण्याची सूचना यावेळी दरेकर यांनी केली.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अहमदनगर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थिती संदर्भात जिल्ह्यातील कृषी व वैदयकीय विभागाचे अधिकारी, तसेच पोलिस यंत्रणांच्या अधिका-यांची बैठक घेऊन कोरोनाची स्थितीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंडे, नगर शहर अध्यक्ष भैय्या गांधी, निवासी जिल्हाधिकारी निचते, जिल्हा कृषी अधिकारी जगताप, आरोग्य अधिकारी डॉ.सागळे, पोलिस विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.