श्रीरामपूर तालुक्यातील एका शेततळ्यात सुमारे 25 हजार माशांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात इसमाने जाणूनबुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यामध्ये सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यातील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणीही दूषित झाले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

तालुक्यातील भेर्डापूर येथे निलेश पंडित कवडे व पंडित लक्ष्मण कवडे यांचे गट नंबर 91/अ मध्ये 1 एकर क्षेत्रात शेततळे असून त्यात त्यांनी मत्स्य पालन केले आहे.

सहा महिन्यांपूर्वी त्यांनी सोयापिनस (कोंबडा) जातीचे 25 हजार मासे या शेततळ्यात सोडले होते. त्यांची आजमितीस पूर्ण वाढ झालेली होती.

मात्र चार पाच दिवसांपूर्वी श्री. कवडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता मासे मृत होऊन तरंगलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले.

त्यानंतर दि. 5 जून रोजी तळ्यातील पूर्ण मासे मृत झाले होते. त्यामुळे श्री. कवडे यांचे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.अज्ञात इसमाने शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारल्याचा अंदाज श्री. कवडे यांनी वर्तविला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here