घन कचरा व्यवस्थापन ठेका सुधर्म एन्व्हायरमेन्ट सोल्युशन प्रा.ली.चांदवडला २३,७५,२०८ रुपयांमध्ये मंजूर झाल्याने ३५ लाखाचा डाव हवेत विरला


श्रीरामपूर(प्रतिनिधी)- शहराच्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेला घनकचरा व्यवस्थापन ठेका पुनर्निविदेमध्ये सुधर्म एन्व्हायरमेन्ट सोल्युशन प्रा.लि. चांदवड, नाशिक या कंपनीला २३,७५,२०८/- रुपये प्रति महिन्याला दिल्याने जनतेचे तब्बल दीड कोटी रुपये वाचले. नव्याने होऊ घातलेल्या जनविकास आघाडीच्या नगरसेवकांसह विरोधी ससाणे व अंजुम शेख गटाने कणखर भूमिका घेतल्याने जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय टळला आहे.
गेल्या महिन्याभरापासून श्रीरामपूर शहरात घनकचरा व्यवस्थापन ठेका निविदा प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. मे २०२० मध्ये पहिल्यांदा निविदा प्रक्रिया राबविली गेली. मे.सद्गुरू बहुउद्देशीय संस्था, तळोदा यांना ३५ लाखांना ठेका देण्यासाठी सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला. मात्र २३ लाखांचे काम ३५ लाखांना म्हणजे तब्बल १२ लाख रुपये प्रति महिना तर दीड कोटी रुपये वर्षाला अधिक रकमेस देण्यास विरोध करत जनविकास आघाडीचे ६, विरोधी ससाणे गटाचे ९, अंजुम शेख गटाचे ६, भारती कांबळे, किरण लुणिया अशा एकूण २३ नगरसेवकांनी विरोध केला. नगराध्यक्षा अनुराधा आदिकांसह १२ नगरसेवकांवर अल्पमतात येण्याची नामुष्की आल्याने ठेक्याची पुनर्निविदा काढावी लागली.
पुनर्निविदेच्या मंजुरीसाठी विशेष सभेत वादळी चर्चा झाली. सुरवातीलाच नगरसेवक दीपक चव्हाण यांनी माहिती लपवणाऱ्या आरोग्य विभाग अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक अंजुम शेख यांनी सत्ताधाऱ्यांना “गंगाधर ही शक्तिमान है” ही उपमा देत चांगलेच खडे बोल सुनावल्याने नगराध्यक्षा आदिक व शेख यांच्यात खटका उडाला. नगरसेविका भारती कांबळे, मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी यांनी नगराध्यक्षा आदिकांना चांगलेच धारेवर धरत घनकचरा व्यवस्थापन ठेक्याची पोलखोल केली.
घन कचरा व्यवस्थापन ठेका देताना टेंडर भरलेल्या सर्व ठेकेदाराला सभागृहात बोलवून कर्मचाऱ्यांचा पगार किमान वेतनाप्रमाणे देण्यासह अटी शर्ती सभागृहाने मंजूर करून घेतल्या. हा ठेका २३ लाख ७५ हजार २०८ रुपयांमध्ये देण्यात आल्याने ३५ लाख रुपयांमध्ये ठेका देण्याचा घाट रचलेल्या काहींना तोंडावर पडावे लागले. २३ नगरसेवकांच्या रेट्याने श्रीरामपूरच्या जनतेचे प्रति महिना १२ लाख तर तब्बल दीड कोटी रुपये वर्षाला वाचणार आहे. घन कचरा व्यवस्थापन ठेक्याच्या वाढीव रकमेला विरोध करत सत्ताधारी गटातील दीपक बाळासाहेब चव्हाण, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, स्नेहल खोरे, शीतल गवारे, वैशाली चव्हाण या ६ नगरसेवकांनी साथ सोडल्याने सभागृहात सत्ताधारी गट अल्पमतात आल्याचे बघायला मिळाले.


त्या “सहा नगरसेवकांमुळे” बदलले सभागृहातील समीकरण ?
घनकचरा व्यवस्थापन ठेक्याच्या वाढीव रकमेस विरोध करत प्रशासनाला धारेवर धरणारे नगरसेवक दीपक चव्हाण यांच्यासह जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, नगरसेविका स्नेहल खोरे, वैशाली चव्हाण, शीतल गवारे यांच्या जनहिताच्या भूमिकेमुळे नगरपालिकेतील सत्ताधारी गटावर अल्पमतात येण्याची नामुष्की ओढावली. पालिकेच्या राजकारणावर या सहा जणांच्या भूमिकेमुळे दुरोगामी परिणाम होण्याची शक्यता आहे


कौटुंबिक दुःखातही स्नेहल खोरेंची विशेष सभेला उपस्थिती
घन कचरा व्यवस्थापन ठेका निविदा प्रक्रिया विशेष सभेच्या पूर्वसंध्येला नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या चुलत्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शहरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून घनकचरा व्यवस्थापन ठेका अवास्तव वाढीव रकमेत दिला जाऊ नये. तसेच कामगारांच्या पगारातही वाढ व्हावी म्हणून कौटुंबिक आघात पचवत आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या नगरसेविका स्नेहल खोरे सभेस उपस्थित राहिल्याने त्यांचे जनहित दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here