कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा, राज ठाकरेंच्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एका चालकाला कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एका चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. यासह राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं दिसत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाने थेट कृष्णकुंजवर धडक दिल्याने मनसैनिकही काळजीत पडल्याचं पाहायला मिळत आहे.

सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी 3 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर त्याचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या सेवकालाही कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर राज ठाकरे यांच्या दोन चालकांनाही कोरोनाची लागण झाली. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासह राज ठाकरेंच्या आजूबाजूला कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता 7 वर पोहचली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 2 वाहनचालकांना याआधीच ‘कोरोना’ची लागण झाली होती. आता पुन्हा एका चालकाला संसर्ग झाल्याने एकूण 3 वाहन चालकांना कोरोना संसर्ग झाला आहे. वाहन चालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केलीय. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं.

दिवसभरात सर्वाधिक 5,024 नवे रुग्ण, आकडा 1 लाख 52 हजारांच्या पार

दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक 5 हजार 024 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 362 रुग्णांना गेल्या 24 तासात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 79 हजार 815 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. राज्यात अनलॉक 1 ची घोषणा झाल्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणार वाढ प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे

राज्यात कोरोनामुळे 7106 रुग्णांचा मृत्यू

आज दिवभरात 175 रुग्णांच्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी गेल्या 48 तासात 91 जणांचा मृत्यू तर उर्वरित 84 जणांचा मृत्यू मागील काळातील आहे. आतापर्यंत राज्यात 7 हजार 106 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.65 टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here