‘उम्मती’ फाउंडेशन तर्फे मागील काही महिन्यांपासून श्रीरामपूर शहरात कोव्हीड योद्धा या पुरस्काराची मालिका सुरू करण्यात आली आहे. कोरोना या महामारीविरुद्ध आरोग्य कर्मचारी, पोलीसदल तसेच सफाई कामगाराबरोबरच शहरात लॉकडाऊनमध्ये विविध सेवाभावी संस्थेनी गोरगरिबांसाठी मोफत जेवण, किराणा किटचे वाटप करून खारीचा वाटा उचलला होता, अश्या सर्वांचा ‘कोव्हीड योद्धा’ या पुरस्काराने ‘साई खेमानंद मेडिकल सेन्टर’, उंबरगाव येथे नुकताच सन्मान करण्यात आला.
सदर अनौपचारिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.के.जमधडे , मानसोपचारतज्ञ व युवा नेते डॉ.चेतन लोखंडे, नगरसेवक मुख्तार शाह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात धर्मगुरू मुफ्ती रिजवान यांनी ‘उम्मती’च्या कोव्हीड योद्धा या पुरस्कारामागची संस्थेची भूमिका विशद करून पवित्र कुराणातीळ अन्नदानाच्या पुण्याचे दाखले दिले. खासदार लोखंडे यांनी उपस्थित सत्कारमुर्तींचे तोंडभरून कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ.जमधडे यांनी कोव्हीड पासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या आचारसंहितेचे वर्णन करून महाराष्ट्र आरोग्यसेवेच्या कोव्हीड विषयक सुविधांचे मार्गदर्शन केले ,डॉ.चेतन लोखंडे यांनी ‘उम्मती’ बरोबर पुढील काळात मानसिक आरोग्यावर उपक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला तर ‘उम्मती’चे अध्यक्ष सोहेल बारुदवाला यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देऊन लवकरच शहरातील सर्व बँकेला मोफत सॅनिटायजर स्टँड देण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमात बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ शाखाधिकारी डॉ.रुपेश शिंदे यांचा विविध शासकीय आर्थिक योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष गौरव करण्यात आला. त्याचबरोबर गुरुद्वारा लंगर कमिटी,भारतीय जैन संघटना, श्री.सिद्धिविनायक पतसंस्था, तृतीयपंथी समाजसेवी संस्था, गरीब नवाज फाउंडेशन, सुलतान हिंद फाउंडेशन, कॉ.जीवन सुरुडे, श्री.राजेंद्र सांगळे, श्री.श्रीकांत थोरात, श्री.अविनाश वानखेडे, श्री.विनोद पंडित, श्री.सुशील शेवाळे, शरीफ शेख, नईम शेख, फरहान केटरर्स आदींचा ‘कोव्हीड योद्धा’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसन्ना धुमाळ यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ.तौफिक शेख व फिरोज पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाकिफ शेख, युसूफ लखानी, डॉ.सुदर्शन रानवडे व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here