श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : एका ६० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. घडलेल्या या गंभीर चुकीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून आता सारवासारव केली जात असून प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
श्रीरामपूर येथील एका ६० वर्षीय रुग्णाला बुधवारी छातीत दुखू लागल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. मात्र त्यास न्यूमोनियाची लक्षणे आढळल्याने नगर येथे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान रुग्णाला सिविलमध्ये भरती करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली.
शनिवारी पहाटे या रुग्णाचा सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. मृतदेह रुग्णवाहिकेतून श्रीरामपूरला नेण्यात आला. हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सकाळी कुटुंबीय व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रुग्णावर अंत्यसंस्कार सुरू असताना जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाºयाने कुटुंबीयांना फोन करत मृतदेह पुन्हा नगरला पाठवण्याची विनंती केली. रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी सूचना केली. मात्र तोपर्यंत अंत्यसंस्कार पूर्ण झाले.
जिल्हा रुग्णालयामधील महिला कर्मचाºयाने आपण रुग्णाच्या वार्डाची प्रमुख आहोत. सकाळी मृतदेह ताब्यात देणाºया कर्मचाºयाला तो कोरोनाचा रुग्ण असल्याची माहिती नव्हती, असे कुटुंबियांना सांगितले. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी रुग्णाचा मृतदेह परत नगरला पाठवण्याचे मला सांगितले आहे, असेही कर्मचाºयांनी स्पष्ट केले.
अधिका-यांनी काय केला खुलासा?
दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते सारवासारव करताना दिसले. रुग्णावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारावेळी दहा ते बारा लोक उपस्थित होते व त्यांनी पीपीई कीट परिधान केले होते. तसेच मृतदेह संपूर्णपणे झाकण्यात आलेला होता ,असा बचाव केला. मात्र मृतदेह नगरहून येथे आणता येत नाही अशी कबुली दिली. रुग्णाच्या कुटुंबातील नऊ जणांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासले जाणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र कुटुंबियांना शुक्रवारी रात्रीच विलगीकरण कक्षात हलवण्यात आले होते.
कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह इतर ठिकाणी हलवला जात नाही तसेच तो कुटुंबीयांच्या ताब्यात देता येत नाही. जिल्हा रुग्णालयाने गंभीर हलगर्जीपणा केल्याचे दिसते आहे. श्रीरामपूर येथील प्रशासनानेदेखील हा धोका ओळखला नाही. रुग्णाचा मृतदेह शहरात आणण्यात आला. तेथे सर्व धार्मिक क्रिया पार पडल्या. आसपासच्या लोकांची गदीर्ही जमली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here