पारनेर/प्रतिनिधी :- शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आमदार नीलेश लंके यांच्या या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमदार नीलेश लंके यांच्या संपर्कात होते.

पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश करण्याचा आमदार लंके यांचा प्रयत्न होता. परंतु काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा हट्ट धरल्याने शनिवारी बारामतीत प्रवेशाचा सोहळा पार पडला.

दुपारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार यांनी सेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह डॉ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी व किसन गंधाडे या नगरसेवकांच्या गळयात पक्षाचा पंचा टाकून पक्षात स्वागत केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, असे सांगून मतदारसंघातील काही जण मतदारांची दिशाभूल करीत आहेत.

मुख्यमंत्री जनतेचे आहेत. मी विधीमंडळात मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे मी सांगेल तेच होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी मतदारांची दिशाभूल थांबवावी, असा अप्रत्यक्ष टोला आमदार लंके यांनी यावेळी माजी आमदार विजय औटी यांना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here