संगमनेर :- राज्यातील आघाडीचे नेते, राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील रॉयल स्टोन या शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली आहे. या वृत्ताने संगमनेरसह राज्यात खळबळ उडाली आहे.
या आधी मंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर तिघेही मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत. आता मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
प्रसार माध्यमांवर बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरील ऑपरेटर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याचे व त्यामुळे मंत्री थोरात यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केल्याचे वृत्त प्रसारीत झाले आहे. त्यामुळे संगमनेरमध्येही याची जोरदार चर्चा सुरु झाली. थोरात यांच्या बंगल्यातील ऑपरेटरची केबीन प्रवेशद्वाराजवळ अाहे. थोरात यांच्या निवासाची व्यवस्था वरच्या मजल्यावर असल्याने, त्यांचा ऑपरेटरशी प्रत्यक्ष संबंध येत नाही.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे या वर्षीच्या दंडकारण्य अभियानाच्या शुभारंभासाठी मंत्री थोरात शनिवार ( ता. 4 ) रोजी संगमनेरात आले होते. रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाल्यानंतर ते सोमवार ( ता. 06 ) रोजी मुंबईला रवाना झाले आहेत. मात्र, मुंबईतून आलेल्या वृत्तानुसार बाळासाहेब थोरात यांच्यासह 20 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
थोरात यांच्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितल्याचे प्रसारीत झाल्याने संगमनेरकरांची चिंता वाढली आहे.