श्रीरामपूर(प्रतिनिधी)- तब्बल दीड वर्षांच्या रखडलेल्या वेतनासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेत ठेकेदारामार्फत कामावर राहिलेल्या अभियंत्याचा जीव टांगणीवर लागला आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनास याबाबत सोयरेसुतक नसल्याने नगरपरिषद नेमकी कर्मचारी,जनतेची काळजी घेण्यासाठी की जिरवण्यासाठी ? असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेत सिव्हिल इंजिनिअर असलेला तरुण काम करत होता. एप्रिल २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीतील या अभियंत्याचे चार लाखांहून अधिक रकमेचे वेतन नगरपरिषदेने थकविले. सदर अभियंत्याने अनेकदा विनवणी करूनही सदर वेतन देण्यात आले नाही. पालिकेच्या प्रमुखांना, प्रशासनास अनेकदा समक्ष भेटूनही वेतन देण्यात न आल्याने अभियंत्यास मानसिक त्रास झाला. अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटल तसेच श्रीरामपूरच्या साखर कामगार रुग्णालयात हा अभियंता ऍडमिट होता. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना पैसे नसल्याने त्याच्या पत्नीने मुख्याधिकारी, श्रीरामपूर यांना विनंतीपत्र देऊन पगार देण्याबाबत विनंती केली. मात्र तरीही नगरपरिषद प्रशासनास जाग न आल्याने सदर अभियंत्यांच्या पत्नीने पती व मुलाबाळांचे काही बरे वाईट झाल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
लाखो रुपयांची ठेकेदारांची बिले अदा करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाकडे कमचाऱ्याचे रखडलेला पगार देण्यासाठी पैसे नाहीत का ? टक्केवारीच्या साठेमारीत एखाद्याचा बळी तर जाणार नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

——————–
अभियंत्याच्या पत्नीच्या मेसेजेसला उडवाउडवीचे उत्तर ?
पतीचा रखडलेला पगार मिळावा म्हणून अभियंत्याच्या पत्नीने नगरपालिकेतील नेतृत्वाला जानेवारी ते मार्च २०२० मध्ये विनवणी करत मेसेजेस केल्याचे समजते. मात्र बघते, बोलते अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने सदर कुटुंब हवालदिल झाल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here