*एक दिवस बाहेर जावून येणाऱ्यांनाही विलगीकरणाची अट*

जिल्हयात येणाऱ्या व जिल्हयातून बाहेर जावून पून्हा परत येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आता पून्हा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन जसे विलगीकरण, मास्क न लावणे व गर्दी करणे याबाबत सूचनांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने, गरज पडल्यास लवकरच पून्हा संपूर्ण जिल्हयात संचार बंदी लागू करावी लागेल असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व जिल्हयातील जनतेला आवाहन केले आहे.
जिल्ह्यामध्ये, कोविड-19 या संसर्गजन्य आजाराचे अनुषंगाने टाळेबंदी जाहिर करण्यात आली असून सर्व व्यक्तींना परवान्यासह आंतरराज्य, राज्यांतर्गत व आंतरजिल्हा प्रवासास मंजुरी देण्यात आली आहे. परराज्यात/राज्यांतर्गत प्रवासाकरीता https://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करुन ई-पास प्राप्त करुन घेण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदरचे ई-पासचा वापर योग्य अतिमहत्वाच्या कामासाठीच करणे अपेक्षित आहे. यापुढे ई-पाससाठी योग्य कारणाशिवाय अर्ज केल्याचे/प्रवास केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकात म्हटले आहे.

यामध्ये बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून विना परवाना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक केल्यास संबंधित वाहनाचे मालकावर रु. 1,00,000/- इतका दंड आकारण्यात येणार आहे. बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून विना परवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर रु. 5,000/- इतका दंड, गृह/संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहण्यासाठी नेमूण दिलेला कालावधी पुर्ण होण्यापुर्वी अनधिकृतपणे बाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर रु. 5,000/- इतका दंड तसेच फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, प्रतिबंधात्मक क्षेत्रातुन (कन्टोनमेंट झोन) बेकायदेशीररित्या बाहेर पडल्यास किंवा आत आल्यास संबंधित व्यक्तीवर रु. 5,000/- इतका दंड आकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहिर केले आहे.
जिल्ह्याबाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तिंना आरोग्य विभाग यांचेकडून दिलेल्या निर्देशानूसार 14 दिवस गृह विलगीकरण वा संस्थात्मक विलगीकरण राहणे बंधनकारक असल्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. जरी एकाच दिवशी जिल्ह्यातून बाहेर जाणे-येणे होणार असेल तरीही गृह/संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल व सदरचे विलगीकरण सबंधाने प्रवास्यांनी चेक पोस्ट वरील वैद्यकीय पथकातील अधिकारी/कर्मचारी याच्याशी हुज्जत घालु नये. त्या अनुषंगाने संबंधित चेक पोस्ट येथे प्रत्येक प्रवासी व्यक्तिकडून हमीपत्र घेणेत येणार आहे. तसेच वैद्यकीय पथकाकडून चेक पोस्ट वरच गृह / संस्थात्मक विलगीकरणाची कार्यवाही पुर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवासी व्यक्तिने स्वत: जिल्हा सामान्य रुग्णालय/उप जिल्हा रुग्णालय/प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे .

सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास, विना मास्क/रुमाल आढळून आल्यास व योग्य कारणाशिवाय दुचाकीने एकापेक्षा जास्त व्यक्ती फिरताना आढळल्यास संबंधित व्यक्तिकडून रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल. व सबब दंड वसूल करण्यास सबंधित तहसिलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत हे सक्षम अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये वैद्यकीय बाबींची असलेली किमान संसाधने व खाजगी दवाखान्यात कोविड-19 च्या अनुषंगाने उपचार होणे शक्य नसल्याने सदरची परिस्थिती आटोक्यात येण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यास १००% संचार बंदीची घोषणा करावी लागेल असे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याकरीता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here