देवळाली प्रवरा / प्रतिनिधी- तब्बल दोन वर्ष पुरेल इतका मोठा दुध पावडरचा साठा राज्यात  शिल्लक असतांना सरकारने परदेशातून दुध पावडर आयात  करणे बंद करावे अशी मागणी नगरजिल्हा डेअरी प्लांट फेडरेशनचे अध्यक्ष गणेश भांड यांनी केली आहे. या बाबत फेडरेशनचे अध्यक्ष भांड यांनी सांगितले, सध्या दुध व्यवसायिकासाठी व दुध उत्पादकांसाठी अत्यंत कसोटीचा व कठिण कालावधी आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला जोड धंदा ओळखल्या जाणाऱ्या दुध व्यवसायाचे कंबारडे मोडले आहे.  ३५ ते ३७ रुपये प्रतिलिटर वरुन दुधाचे भाव १८ ते २० रुपये प्रतिलिटर वर आले आहेत. सततचा दुष्काळ ,त्यानंतर झालेली अतिव्रुष्टी अशा आस्मानी व सुलतानी दोन्ही संकटांना तोंडदेत दुध उत्पादक शेतकऱ्यांनी पोटच्या पोरा प्रमाणे पशूधन सांभाळलं. कोरोनामुळे शेतीमालाची पुरती वाट लागली असतांना एकमेव आशेचा किरण असणारा दुध धंदाही मोडकळीस आला आहे. एकी कडे पशूखाद्याच्या किमती आकाशाला भिडत आहेत तर दुसरी कडे मात्र दुधाचे दर रोज कोसळताहेत. यातून ग्रामीण भागातील दुध उत्पादक शेतकरी सावरण्यासाठी सरकारने जास्ती जास्त दुध खरेदी करुन दुधाची दरवाढ केली पाहिजे. परंतू दुर्दैवाने तसे न होता सरकार फक्त घोषणाबाजी करतांना दिसत आहे. प्रत्यक्ष आंमलबजावणी मात्र होतांना दिसत नाही. सरकारने सांगितले होते आम्ही दिड कोटी लिटर दुध खरेदी करु व दुधभुकटी प्रकल्प सुरु करुन अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवू . या घोषणेचे पुढे काय झाले कोणालाच माहिती नाही.दुध जर अतिरिक्त झाले तर शहरी भागातील लोकांना आजही दुधाचा तुटवडा का आहे . याचे उत्तर सरकारने द्यावे. आज दुध उत्पादक देशोधडीला लागला आहे. त्याला सावरण्यासाठी शासनाने त्वरीत दुध भुकटी आयात बंद करुन प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपये दरवाढ करण्याचे किंवा अनूदान देण्याची मागणी केली आहे.  या बाबत शासनाने वेळीच गाभिर्याने दखल न घेतल्यास आंदोलनाच्या पावित्र्यात असलेला दुध उत्पादक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का आंदोलनाचा भडका उडाला तर ते कोणालाही सहजासहजी आवरणे शक्य होणार नाही असे भांड यांनी सांगितले.

  शेतीला जोड धंदा म्हणून राज्यात निवडून आलेल्या वेगवेगळ्या सरकारने दुध व्यवसायाला नवी ताकद उभारी दिली. एके काळी सरकारने दुधाचा महापुर अशी योजना राबविली. आणि दुधपुरवठ्यात राज्य स्वयंमपुर्ण झाले. यातून लाखो प्रपंच उभे राहिले. शेतीला आधार मिळाला. ग्रामीण जनतेला रोजगार मिळाला. नोकरी मागे धावणारा सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरला. बघता बघता व्यवसायाची भरभराट झाली परंतू आज हाच व्यवसाय मोडकळीस आला आहे. रोज कोसळणारे दुधाचे दर यामुळे कामगारांचे पगार, दुध उत्पादकांची देणी व बँकेचे व्याज भरणे ही अवघड झाले आहे. मोठ्या कष्टातून उभा राहिलेला हा व्यवसाय सरकारच्या दुर्लक्षी धोरणामुळे संपण्याच्या मार्गावर आहे. आणि असे झाले तर लाखो बेरोजगार होतील. लाखो चुली बंद पडतील. हे पाप कोणाच्या माथी मारणार ?  असा सवाल जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष गणेश भांड यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here