श्रीरामपूर- जनतेची सेवा करण्यासाठी उभ्या असलेल्या नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या २६ वर्षांपासून माय लेकाला स्वतःच्या घरी जाण्यासाठी रस्ताच नसल्याची शोकांतिका उघड झाली आहे. १५ दिवसात नगरपालिकेच्या प्रशासनाने येण्या जाण्यासाठी रस्ता न दिल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा पावित्रा श्रीमती रोहिणी जठार यांनी घेतला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात जठार यांनी म्हटले आहे की, गेल्या २६ वर्षांपासून थत्ते मैदान परिसर येथील गट नं.४५ येथे स्वतःच्या मालकीच्या जागेत राहतात. त्यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. त्यांना घराकडे जाण्यासाठी त्यांना ३० फुटी रस्ता मंजूर आहे. मात्र पतीच्या अकाली निधनानंतर त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद झाला. त्यामुळे त्यांना गेल्या १० वर्षांपासून दुसऱ्याच्या जागेतून जावे लागत आहे. अनेकदा नगरपरिषद प्रशासनाला लेखी पत्र देऊन, समक्ष भेटून रस्ता खुला करून देण्यात आला नसल्याचे जठार यांनी म्हटले आहे.
गेल्या १० वर्षांपासून जाण्या येण्यासाठी रस्ता खुला नसल्याने घरी जाताना त्रेधातीरपट करत जावे लागत असल्याने श्रीमती जठार यांनी मुख्याधिकाऱ्यांनी १५ दिवसात रस्ता खुला करून न दिल्यास त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. लाखो रकमेची जठार यांची जागा हडप करण्याचा कोणाचा मनसुबा आहे का ? रस्ता नसल्याने मोक्याची जागा कमी किमतीत बळकवण्याचा कोणाचा डाव आहे का ? असे अनेक प्रश्न आता जनता एकमेकांना विचारू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here