श्रीरामपूर(प्रतिनिधी)- जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड कोरोना व्हायरसचे श्रीरामपूर शहरात काही दिवसातच पेशंट झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या विचारात घेत उपाययोजना म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय सुरू करावे अशी मागणी जनविकास आघाडीचे नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण, संतोष कांबळे, जितेंद्र छाजेड, जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका स्नेहल केतन खोरे, शितल आबासाहेब गवारे, वैशाली दीपक चव्हाण यांनी केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी, श्रीरामपूर यांचेकडे केलेल्या मागणीत जनविकास आघाडीच्या नगरसेवकांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या थैमानाने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. भारतात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे. तर श्रीरामपूर शहरात कोरोना रुग्णांची शंभरी पार झाली आहे. श्रीरामपूरच्या रुग्णांसाठी प्रशासकीय यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. शहरात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे रुग्णालय उभारल्यास कोरोनाशी लढता येईल. मुंबईसह अन्य शहरांमध्ये याच धर्तीवर तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय सुरू झाले आहे. तेथील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील कोरोना बाधित, संशयित रुग्णांना या रुग्णालयाचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत असल्याचे जनविकास आघाडीच्या नगरसेवकांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेने सामान्य व गरीब रुग्णांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. नगरपालिकेस पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाल्याने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधणे सहजशक्य आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना नगर, पुणे, मुंबईला उपचारासाठी जाणे शक्य नाही. वाढत्या रुग्णांमुळे सेन्टलुक हॉस्पिटलचे बेड अपूर्ण पडतील. येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचा गांभीर्याने विचार करत नगरपालिका प्रशासनाने तात्काळ तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय उभारून जिल्ह्यासह राज्यातील नगरपालिकांसाठी आदर्श उभा करावा. श्रीरामपूरच्या जनतेसाठी नगरपालिकेने तात्काळ कोविड रुग्णालय उपलब्ध करावे अशी मागणी नगरसेवक जितेंद्र छाजेड, दीपक बाळासाहेब चव्हाण, संतोष कांबळे, नगरसेविका शितल आबासाहेब गवारे, वैशाली दीपक चव्हाण, स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here