कुटुंबातील चार सदस्य बाधित : कुटुंबप्रमुख मात्र निगेटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) :- शहर पोलीस दलातील एका सहायक निरीक्षकांच्या घरामध्ये करोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. या निरीक्षकांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी व त्यांच्या मातोश्रीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, निरीक्षकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी मुख्यालयातील एका पोलीस कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी निरीक्षकांच्या घरामध्ये करोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस दलातही करोना हळूहळू पाय पसरायला लागल्याने पोलीस दल सतर्क झाले आहे.

काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका निरीक्षकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या निरीक्षकांच्या घराशेजारी शहर पोलीस दलातील सहायक निरीक्षकांचे घर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षकांच्या घरी काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सहायक निरीक्षकांच्या कुटुंबाने हजेरी लावली होती.

वाढदिवसानंतर ‘लाचलुचपत’च्या निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस दलातील सहायक निरीक्षकांसह त्यांचे कुटुंब होम क्वारंटाईन झाले होते. यानंतर त्यांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. हे सर्व अहवाल सोमवारी प्राप्त झाले असून यामध्ये सहायक निरीक्षकांच्या कुटुंबातील सर्वांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, कुटुंबप्रमुख असलेल्या सहायक निरीक्षकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, ‘लाचलुचपत’ निरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली होती. जे संपर्कात आले त्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले होते. यामुळे पोलीस दलातील सहायक निरीक्षकांचा पोलीस ठाण्याशी संपर्क झाला नसल्याने व त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलीस ठाण्यातील इतरांना याचा काही धोका नसल्याचे सूत्रांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here