फोटो कॅप्शन – आंबी : अतिवृष्टीमुळे कपाशी पिकामध्ये घुसलेले पावसाचे पाणी. (छाया : संदिप पाळंदे)
आंबी/प्रतिनिधी (संदिप पाळंदे) :- आंबी व अंमळनेर परिसरात नुकत्याच झालेल्या ६२ मी. मी. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी साचल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आंबी येथील सरई परिसरातून गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने ओढा वाहत होता. मात्र मागील काही वर्षांत सदर ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाऊन पर्यायी मार्गाने पाणी वळविण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पाणी नैसर्गिक रीतीने वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन हे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. अशीच काही परिस्थिती अंमळनेर भागातही झालेली दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांची मका, सोयाबीन, कपाशी, फळबागा, चारापीके हातची जाण्याच्या भीतीने शेतकरी हैराण झाला आहे. शेजारील डुकरे वस्तीला पाणी खेटले असून अजून अतिवृष्टी झाल्यास या वस्तीमध्ये पाणी घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटाने आधीच बळीराजा मेटाकुटीला आला असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. कर्ज काढून, उधारी उसनवारी करून शेतीची मशागत, पेरणी करून कशीबशी पिके जगवली. मात्र आलेल्या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
दरम्यान सदर भागाची कामगार तलाठी रुपेश कारभारी, कृषी सेवक कचेश्वर काळे, कोतवाल सचिन रणदिवे यांनी पाहणी केली. यावेळी आंबीचे सरपंच वंदनाताई अशोक साळुंके, माजी सरपंच हरिश्चंद्र साळुंके, बापु साळुंके, अंमळनेरचे सरपंच रोहण जाधव, माजी उपसरपंच विजय डुकरे, जेष्ठ नेते भागवत कोळसे आदींनी सदर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
“आंबी व अंमळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून महसूल प्रशासन व कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत. याकामी आंबी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल.
– वंदनाताई अशोक साळुंके (सरपंच आंबी)
“अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार मा. फसीयोद्दीन शेख यांच्याशी चर्चा केली असून त्यांचा आदेश येताच नुकसानीचे पंचनामे करण्यासंबंधी पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल.”
– रुपेश कारभारी (कामगार तलाठी, आंबी)