श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- श्रीरामपूर शहर व तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कालही पुन्हा १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. श्रीरामपूर शहरातील तुरुंगातही करोनाचा शिरकाव झाला असून चार कैद्यांनाही करोना झाला आहे. त्यामुळे तालुक्यात करोना पॉझिटिव्हचा आकडा २०८ वर जावून पोहोचला आहे.
शहरातील संजयनगर भागात (२), वॉर्ड नं.१ (१) , वॉर्ड नं. २(१) , वॉर्ड नं.४ (६) तसेच श्रीरामपूर तुरुंगातील चार आरोपींचा यात समावेश आहे. हे चार आरोपी वॉर्ड नं. १ व वॉर्ड नं. २ मधील प्रत्येकी एक तर संजय नगरमधील दोघांचा समावेश आहे. वॉर्ड नं. ४ मधील ६ रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. तर बेलापूर येथील एकाच कुटुंबातील ९ जण पॉझिटिव्ह असून त्यांचे अहवाल हे खासगी लॅबमधून आले आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली
काल एकूण ४० लोकांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले असून त्यातील १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोघेजण करोना वर मात करून घरी परतले आहेत.
आतापर्यंत ८४६ जणांचे घशाचे स्त्राव तपासण्यात आले असून यातील २०८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ५३३ अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन रुग्ण सराला बेटावरील नसून ते सराला गाव परिसरातील असल्याचे सांगण्यात आले.
श्रीरामपूर येथे एका कंपनीत काम करणााऱ्या बेलापुरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल काल प्राप्त झाला असून त्यातील ९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे बेलापुरात खळबळ उडाली असून त्या कुटुंबात काही दिवसापूर्वी दु:खद घटना घडली होती. त्यामुळे त्या कुटुंबाच्या संपर्कात आणखी गावातील व्यक्ती आले असून त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. देविदास चोखर यांनी केली आहे