श्रीरामपूर/प्रतिनिधी (संदिप आसने) :- राज्‍यातील दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांकडे जाणीवपुर्वक केलेल्‍या दुर्लक्षाचा निषेध म्‍हणून महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी सभापती दिपकराव पटारे तसेच पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ ऑगस्‍ट २०२० रोजी वेगवेगळ्या ठिकाणी ‘एल्‍गार आंदोलने केली. त्यानंतर दूध उत्‍पादक शेतकरी आणि कार्यकर्त्‍यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टसिंग ठेवून र्मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. बोलताना दिपकराव पटारे म्हणाले कि
दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या समस्‍या दिवसागणीक वाढत चालल्‍या आहेत. शेतीला जोडधंदा म्‍हणून दूग्‍ध व्‍यवसाय शेतक-यांना आधार ठरला असतानाच या व्‍यवसायाकडेच महाविकास आघाडी सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. कोरोना संकटामुळे दूध उत्‍पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्‍यात दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍याही आत्‍महत्‍या सुरु झाल्‍या पण त्‍याच्‍याही संवेदना या सरकारला राहीलेल्‍या नाहीत. कोरोना संकटात दूध उत्‍पादक शेतक-यांना २५ रुपये हमीभाव देण्‍याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्‍यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही, महाविकास आघाडी सरकारने दूध उत्‍पादक शेतक-यांची फसवणूक केली. सध्या कांद्याचे भाव पडलेले आहेत त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.

राज्‍यात भाजपाच्‍या वतीने दूध उत्‍पादकांचे आंदोलन झाल्‍यानंतर सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. परंतू मंत्रीमंडळाच्‍या दोन बैठका होवूनही दूध उत्‍पादकांच्‍या बाबतीत महाविकास आघाडी सरकार कोणताही ठोस निर्णय घेवू शकले नाही. शासनाच्‍या निर्णया विरोधात जावून सरकारमधील मंत्र्यांच्‍या दूध संघानीच उत्‍पादकांना कमी दरात दूध खरेदी करण्‍याची भूमिका घेवून एकप्रकारे उत्‍पादकांवर अन्‍याय केला आहे. शासनाच्‍या या निष्‍क्रीयतेचा आम्ही निषेध करत आहोत.
जनावरांच्‍या खाद्याचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे दूधाला मिळणारा कमी दर त्‍यामुळे ग्रामीण भागातील हा शाश्‍वत व्‍यवसायही मोडकळीस आणण्‍याचे पाप महाविकास आघाडी सरकारकडुन होत आहे. निद्रीस्‍त सरकारला जाग आणण्‍यासाठी भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने २० जुलै रोजी राज्‍यभर आंदोलन करुन दूधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा, दूध उत्‍पादक शेतक-यांना प्रतिलिटर १० रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे अशा मागण्‍याचे निवेदन दिले होते. या मागण्‍यांबाबत सरकारने कोणताच निर्णय केला नाही. यामुळेच महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून गावपातळीवर, तालुका स्‍तरावर दूध उत्‍पादक शेतकरी तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांनी वेगवेगळ्या गावातून आंदोलने केली. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून दुधा बरोबर कांदा सडत पडला आहे कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकारने या अंदोलनाची दखल घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा अन्यथा पुढच्या काळात प्रखर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिपकराव पटारे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, पंचायत समिती सदस्या कल्याणी कानडे, वैशाली मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन भागडे, माजी सभापती नानासाहेब पवार , गिरीधर आसने, सुनील वाणी , भाजपचे बबनराव मुठे, नगरसेवक सुभाष गांगड, सतिश सौदागर, विशाल अंभोरे, संचित गिरमे, रामभाऊ लिप्टे, राधाकृष्ण आहेर, नानासाहेब तनपुरे, गणेश मुदगुले, चित्रसेन रनवरे, अनिल थोरात, रावसाहेब थोरात, ईश्वर दरंदले,आण्णा शेळके, काशिनाथ तनपुरे, संजय भिसे, दिलीप कवडे, आनंदा थोरात, राहुल पटारे, रमेश धुमाळ युवराज थोरात, प्रसाद सातुरे, सिद्धार्थ साळवे, अमोल जानराव, शंतनु फोपसे नानासाहेब तुपे, मुक्ताजी पटांगरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here