कोपरगाव/प्रतिनिधी(मधुकर वक्ते) :- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या व कोपरगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, छोटेमोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या शाश्वत अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणारे आशास्थान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक सुधाकर कोंडाजी रोहोम यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी सुधाकर रोहोम यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुधाकर रोहोम म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्यांवर कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे प्रेम करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे.हीच परंपरा कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी पुढे चालविली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे हे माझ्यासारख्या तरूण संचालकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.कोपरगाव तालुक्याच्या विकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असतांना कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या सोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचे निश्चितपणे सोने करून कोपरगाव तालुक्याची कामधेनु असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी योगदान देणार असल्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी बोलतांना मावळते उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या सोबत काम केले व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या सोबत देखील उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असतांना कारखान्याचा आदर्श कारभारी कसा असावा हे मी आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीतून अनुभवले आहे. आमदार आशुतोष काळे हे काळे परिवाराचा आदर्श समाजकारणाचा वसा पुढे चालवीत आहे. कोपरगाव तालुक्याच्या जनतेने त्यांच्या खांद्यावर दिलेली विकासाची जबाबदारी ते निश्चितपणे पार पाडणार आहे हे त्यांनी निवडून आल्यानंतर तीन महिन्यातच कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाला हात घालून पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण केले आहे. यदाकदाचित जर कोरोना संकट नसते तर मतदार संघातील जनतेला यापेक्षाही अधिक विकासकामे कोपरगाव तालुक्यात सुरु असलेली दिसली असती. तरीही आमदार आशुतोष काळे यांच्या हातात कोपरगावच्या विकासाचे भविष्य सुरक्षित असून निश्चितपणे येणारा काळ हा उज्ज्वल असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी एस.डी.शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक सह.संचालक रामेंद्रकुमार जोशी व सहाय्यक म्हणून एस.व्ही.सूरम यांनी काम पाहिले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा संचालक मंडळाच्या सत्कार करण्यात आला.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सुधाकर रोहोम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे, समवेत माजी आमदार अशोकराव काळे, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्रकुमार जोशी आदी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here