श्रीरामपूर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर नगर पालिकेत नव्याने दाखल झालेल्या मुख्याधिकार्यांनी मनमानी कारभार करून व्यापारी वर्गास त्रास देण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मुख्याधिकार्यांचा या मनमानीमुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याचे येथील व्यापारी सुमित मुथ्था यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मुख्याधिकारी डेरे हे श्रीरामपुरात हजर झाल्यापासून मनमानी कारभार पाहत आहेत. आपल्या मर्जीतील काही प्रमुख कर्मचार्यांना पाठवून व्यापारी वर्गास त्रास देत आहेत. व्यापारी वर्गावर ओरडणे, फौजदारी कारवाईची धमकी देणे असा प्रकार चालू आहे. हे मुख्याधिकारी येण्याआधी सर्व सुरळीत चालू होते.
व्यापारी व नगरपालिका प्रशासन यांच्या एकमेकांत योग्य समन्वय होता. सायंकाळी पाचनंतर पाऊस चालू असेल तर काही व्यापारी पाऊस बंद होण्याची वाट पहातात. काहींची घरे दूर आहेत ते दुकान बंद करून पावसात भिजत जाऊ शकत नाही.
लॉकडाऊन काळात व्यापारी वर्ग नगरपालिका कर, टॅक्स, कामगारांचे पगार, लाईट बिल भरून आर्थिक गर्तेत आहेत. त्यात पालिकेच्या कर्मचार्यांकडून २०००/- रुपयांची पावती हातात ठेवली जाते. त्यांच्या बोलण्याला आणि अरेरावीला व्यापारी वैतागले आहेत. मुख्याधिकार्यांनी नेमलेल्या पथकातील महिला कर्मचार्यांसाठी व्यापारी वर्गाशी सौज्यन्याने वागण्याची समज द्यावी, अशी मागणीही व्यापारी वर्गाच्यावतीने सुमित मुथ्था यांनी केली आहे.