अहमदनगर :- बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी शहर पोलिसांनी सोमवारी गणेश मंडळांसोबत बैठक आयोजित केली होती.
शहर पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली कोतवाली पोलीस ठाण्यात ही बैठक पार पडली. या बैठकीला कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील ३५ गणेश मंडळलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नगर शहरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा मात्र या उत्सवावर करोनाचे सावट आहे. 22 तारखेला गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. विसर्जनाच्या अगोदरच्या दिवशी मोहरम आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात मध्यवर्ती शहरातील गणेश मंडळांची बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली.
यावर्षी मंडळाने आपल्या भक्तांसाठी ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून द्यावे, गर्दी करू नये, रक्तदान शिबीर सारखे सामाजिक उपक्रम राबवावे, कोणाकडूनही सक्तीने वर्गणी वसूल करू नये आदीसह शासनाने ठरवून दिलेल्या नियम मंडळ प्रमुखांना सांगितले असल्याची माहिती उपधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
करोनाचे संकट सुरू असून विशेषत: शहरात रोजच शंभराच्या पटीत पॉझिटिव्ह रिपोर्ट येत आहे. उत्सव काळात हे संकट आणखी गडद होण्याची भिती प्रशासनाला आहे. यामुळे शहर पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे.