श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर शहराच्या इतिहासात न घडलेल्या दुर्दैवी घटना गेल्या काही वर्षात घडत आहेत. सालाबादप्रमाणे गणपती स्टॉलधारकांना गणेश मूर्ती, सजावट व इतर सामान विक्रीसाठी मेनरोडवर परवानगी मिळणे अपेक्षित असताना नगरपालिकेच्या अपरिपक्व, अर्धवट कामकाजाचा फटका स्टॉलधारकांना बसल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
याबाबत समजलेले वृत्त असे की, रक्षाबंधन काळात स्टॉलधारकांना मेनरोडवर स्टॉल लावण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. कोरोना काळातील सर्व नियम अटी पाळून गणपती काळात तरी स्टॉलधारकांना मेनरोडवर परवानगी मिळेल अशी आशा होती. सामान्य स्टॉलधाकांचा विचार करून काही नगरसेवकांनी प्रयत्नही सुरू केले. मागील आठवड्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत परवानगीची सर्व कागदपत्रे तयार केली असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे असा शेरा मारत खोडा घालण्याचा पालिकेतील अतितज्ज्ञाने केल्याचा दुजोरा जबाबदार अधिकाऱ्याने दिल्याचे समजते. काल पार पडलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नगरपालिकेच्या सत्ताधारी मंडळींपुढे अधिकाऱ्यांनी थत्ते मैदान व मिनी स्टेडियम येथे परवानगी देण्याचे जाहीर केले असता लोकप्रतिनिधींनी त्यास मुकसंमती दिल्याचे दिसून आले.
त्यांनतर स्टॉलधारकांचा रागरंग लक्षात घेत शांतता बैठकीतून याबाबत ब्र शब्द न काढता बाहेर पडणाऱ्या अतितज्ज्ञ मंडळींनी काही स्टॉलधारकांना नगरपालिकेत बोलवून मेनरोडवर स्टॉल लावण्यास परवानगी देत असल्याचे तोंडी जाहीर केले. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बेफान होऊन भाषणेही ठोकली. इतकेच काय तर एका न्यूज पोर्टलला नगरपालिकेच्या सर्वेसर्वा असलेल्या लोकप्रतिनिधीने मेनरोडवर स्टॉल लावण्याचे जाहीर केले. तशी पेपरबाजीही करत स्वतःचीच पाठ थोपटूनही घेतली. आपल्याला स्टॉल लावण्यास परवानगी मिळाल्याच्या आनंदात काही स्टॉलधारकांनी रात्री मेनरोडवर स्टॉल लावणे सुरू केले असता पोलीस प्रशासनाने त्यास विरोध केला. संबंधित स्टॉलधारकांवर मध्यरात्री बांधलेले स्टॉल काढण्याची दुर्दैवी वेळ आली असता मध्यरात्री एका फाउंडेशनचे अध्यक्ष असलेले नगरसेविकेचे पती वगळता कोणीही पुढारी तिकडे फिरकले नाही.
आज सकाळी पुन्हा नगरपालिकेत पोलीस निरीक्षक साहेब, मुख्याधिकारी साहेब यांच्यासह लोकप्रतिनिधी यांची बैठक सुरू झाली. त्यात मेनरोड नाही तर थत्ते मैदान येथे स्टॉल लावावेत असे स्पष्ट करण्यात आल्याने नेमके पालिकेत मुख्य पदावर बसलेले लोकप्रतिनिधी शोभेची बाहुली आहे का ? बालिशपणात गरिबांच्या अन्नात माती कालवण्याचा निंदनीय प्रकार जाणीवपूर्वक केला जात आहे का ? काल दिलेली तोंडी परवानगी, न्यूज पोर्टलला दिलेल्या बाईट, पेपरच्या बातम्या फक्त पब्लिसिटी स्टंट होता का ? परवानगीच्या कागदावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा शेरा जाणीवपूर्वक मारून स्टॉलधारकांच्या अडवणुकीचा हेतू होता का ? असे अनेक प्रश्न स्टॉलधारक एकमेकांना विचारत असून नगरपालिकेत बोलघेवडेपणाने भाषणबाजी करणारे काही अर्धवटराव चांगलेच तोंडावर आपटल्याची आल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here