श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील मुख्य रस्त्यावर मेनरोड येथे मुख्य बाजारपेठ असल्याने खरेदीच्या निमित्ताने महिला वर्गाची मोठी वर्दळ सुरू असते. मेनरोड व शिवाजीरोडवर पुरुषांसाठी सार्वजनिक मुतारी नगरपालिका प्रशासनाने फार पूर्वीपासूनच उपलब्ध करून दिलेली आहे.

नंतरच्या काळात महिलावर्गाची कुचंबना होऊ नये म्हणून नगरपालिकेने मेन रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याच्या मागील बाजूस महिला शौचालय उभारले. मात्र योग्य त्या देखभाल व दुरुस्ती अभावी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हेच महिला प्रसाधनगृह आज दुर्गंधीगृह ठरत आहे.

या शौचालयात पाण्याची सुविधा नसते, फरशी फुटलीय,फरशीवर पावसाचे पाणी तुंबलेले त्यातच भर म्हणून की काय या साचलेल्या पाण्यात अळ्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. इथले शिल्लक नळ देखील तुटलेल्या अवस्थेत असल्याचे महिलांचे सांगणे आहे. याच परिसरातील महिला व्यावसायिक व दक्ष नागरिक लता भारस्कर यांनी याप्रकरणी वेळोवेळी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील केली.

मात्र दरवेळी केवळ जुजबी कार्यवाही होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्वच्छता विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर स्वच्छता ठेकेदाराचे कर्मचारी तात्पुरती स्वच्छता करतात व त्यांच्याकडील नोंदवहीत संबंधित तक्रारदाराकडून तसे नोंदवून स्वाक्षरी घेतात. मात्र पुन्हा तक्रार केल्याशिवाय ते फिरकतही नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे प्रमुख एस.बी.आरणे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता शहरातील मुतारी स्वच्छतेचा ठेका टेंडर पद्धतीने दिलेला असून दिशा एजन्सी यांची मुदत नुकतीच जुलै महिन्यात संपल्याने सध्या हे काम सुधर्म एनव्हारन्मेंट चांदवड यांच्याकडे असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here