श्रीरामपूर(प्रतिनिधी)- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून बाजारपेठ बंद करण्यासाठी काही कारभारी एकत्र आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. असेच श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी एकमत करावे अशी अपेक्षा मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत दिलेल्या सविस्तर वृत्तात खोरे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपालिकेने कोरोना विरोधात लढण्यासाठी श्रीरामपूरची सामान्य व गरिबांना परवडणारी आरोग्य व्यवस्था उभारून मजबूत करणे गरजेचे आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने कोरोना केअर सेंटर(तात्पुरते हॉस्पिटल) व कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करावे यासाठी गेल्या महिनाभरापासून आम्ही मागणी करत आहोत. गाव बंद करण्यासाठी नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधक दोघेही एकत्र आल्याने नगरपालिकेचे कोरोना हॉस्पिटल व टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा प्रश्नही निकाली लागू शकेल ही अपेक्षा आहे. श्रीरामपूरच्या कोरोना बाधित रुग्णांना जास्त त्रास जाणवू लागला तर लोणी, विळद घाट, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर, पुणे, नाशिक येथे बेड्स उपलब्ध करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचे मूळ कारण श्रीरामपूरमध्ये सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यात आलेले अपयश आहे का ? असा सवाल केतन खोरे यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे शिर्डी नगरपंचायत, संगमनेर नगरपरिषद, अहमदनगर महानगरपालिकेने तेथील नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा उभ्या केल्या तर श्रीरामपूर नगरपालिकेला अजूनही याबाबत गांभीर्य नसल्याने नागरिकांवर दुर्दैवी वेळ येत आहे. सद्यस्थितीला श्रीरामपूरची कोरोना रुग्ण संख्या १ हजारहून अधिक आहे. शहरातील दोन खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी उपचार व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र गरिब व सर्वसामान्य नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार करणे परवडणार आहे का ? हा मोठा प्रश्न असल्याचे केतन खोरे यांनी म्हटले आहे.
राज्य व केंद्र सरकारने कोरोना विरोधात लढताना संसर्ग वाढू नये म्हणून सुरवातीला लॉकडाऊन केले सोबतच उपचार सुविधा उभारत टेस्टिंग लॅब, कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल सुरू करण्यावर भर दिला. त्यामुळे राज्यासह देशात ब-या होणा-या रुग्णांची संख्या वाढली. हे साधे-सोपे-सरळ सूत्र श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाला समजत नसेल तर नवलच. अजूनही वेळ गेलेली नाही, श्रीरामपूर नगरपालिकेने शहरवासीयांसाठी कोरोना केअर सेंटर(तात्पुरते हॉस्पिटल) व स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करावी अन्यथा कोरोनाच्या उपचारविना श्रीरामपूरकरांचे बळी गेल्यास त्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन व गाव बंद करण्यासाठी पुढाकार घेणारे कारभारी घेणार का ? असा संतप्त सवाल मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here