आंबी – गेल्या जुन महिन्यापासून सततच्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, केसापूर येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात तरंगताना पाहून बळीराजाच्या कडा पान्हावल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सरई परिसरातील ओढ्याला पूर आला असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे नुकताच दुरुस्ती केलेला आंबी-देवळाली प्रवरा रस्ता वाहून जातो की काय असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी पाहणी करून तलाठी व कृषिसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.
देवळाली प्रवरा मंडळातील आंबी, अंमळनेर भागात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, मका, भुईमूग, कांदा रोपे, चारपीके, फळबागा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले असून प्रशासनामार्फत लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसान झालेल्या पिकांची तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी समक्ष पाहणी केली. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला.

“कोरोनामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात शेतमालाला भाव नाही. त्यात हे अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी बेजार झाला असून प्रशासन पंचनामे सुरू करणार आहेत ही बाब स्वागतार्ह आहे. आता लवकरात लवकर बधितांना आर्थिक भरपाई देऊन दिलासा द्यावा.” – जालिंदर रोडे (तालुकाध्यक्ष – धनगर समाज संघर्ष समिती, राहुरी)

“निर्यात बंदीमुळे आधीच कांद्याने डोळ्यात पाणी आणले असताना सततच्या पावसाने पिके पाण्यात बुडाली आहे. हिरवा चारा शेतात पाणी साचल्याने काढता येत नाही. उधारी उसनवारी करून शेती करत आहोत. मात्र पावसाने झोडपले असून दाद कोणाकडे मागायची? शासनाने नुकसानभरपाई देऊन मदत करावी. – रायभान चाचा जाधव (प्रगतिशील शेतकरी, अंमळनेर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here