श्रीरामपूर/प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य बीयाणे महामंडळाने लाभधारक शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना महामंडळाकडून चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे बीयाणे देवून उत्कृष्ट मार्गदर्शन करून सोयाबीनचे उत्पन्न घेतले आहे. लाभधारक शेतकऱ्यांकडील तयार झालेले सोयाबीन तात्काळ खरेदी करून अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना महामंडळाने दिलासा द्यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केली आहे.
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व आ. लहू कानडे यांना पाठविलेल्या पत्रात श्री. मुरकुटे यांनी म्हटले आहे की, महाबीजच्या नियमाप्रमाणे, तज्ञांच्या देखरेखीखाली लाभधारक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे चांगले उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांकडील वाळवून तयार झालेले सोयाबीन ताबडतोब खरेदी करून शेतकऱ्यांना महामंडळाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे सोयाबीन साठवणुकीसाठी ‘शेड’ नाहीत. अनेक गोरगरीब शेतकऱ्यांनी छपरातील गुरेढोरे पावसात बांधून छपरात सोयाबीन साठवली आहे. अतिवृष्टीमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे पैसे वेळेत मिळाल्यास प्रपंचासाठी, रब्बी हंगामाच्या तयारीसाठी त्याचा उपयोग होईल. लाभधारक शेतकऱ्यांकडील सोन्यासारखे सोयाबीन अकोल्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचे व तेथून अहवाल आल्यावर सोयाबीनची खरेदी करायची असे महामंडळाच्या कार्यालयातून सांगण्यात येते. महामंडळाकडे कर्मचारी संख्या पुरेशी नसून कामाची गतीही कासवासारखी आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीस विलंब होत आहे.
राज्यभर अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जे सोयाबीन चांगले आले आहे त्याची महाबीजने प्राधान्याने व लवकर खरेदी करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे हे चांगले सोयाबीनही खाजगी व्यापारी खरेदी करतील व महाबीजला सोयाबीन बियाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागेल.
महाबीजने त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करून सर्व सोपस्त तातडीने पूर्ण करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लाभधारक शेतकऱ्यांकडून ‘सोयाबीनची’खरेदी करावी अशी मागणी श्री. मुरकुटे यांनी केली असून याबाबत आपण महाबीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here