श्रीरामपूर/प्रतिनिधी :- आज पर्यंत बिबट्याने लहान मुलांवर,माणसांवर,जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या.मात्र आज बिबट्याने बिबट्यावरच हल्ला केल्याची घटना आज घडली असून यामध्ये एक बिबट्या जखमी झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे आज आज दि 26 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास दोन बिबट्या मध्ये झुंज झाली,यावेळी यामध्ये एक बिबट्या जखमी झाला तर एका बिबट्याने जवळच असलेल्या उसाच्या शेतामध्ये धूम ठोकली, तर दुसरा बिबट्या जखमी अवस्थेत आदिक यांच्या घराच्या आडोशाला येऊन बसला. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर (नवे गावठाण) येथे हरिश्चंद्र भानुदास आदिक यांची शेती असून त्यांच्या शेतात असलेल्या घासाच्या पिकात काल दि.२६ रोजी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळ्या व गायीच्या हंबरण्याचा आवाज आल्याने हरिश्चंद्र आदिक यांना जाग आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता, दोन बिबट्याची झुंज चालू असल्याचे त्यांनी बघितले,त्यानंतर त्यांनी याबाबत आरडाओरड करुन व फोनद्वारे त्यांचे भाऊ,पोलीस पाटील तसेच शेजारी यांना माहीती दिली. यावेळी नागरिकांनी आरडाओरड केल्याने एक बिबट्या शेजारी असलेल्या दिगंबर आदिक यांच्या उसात पसार झाला, तर दुसरा बिबट्या हरिश्चंद्र आदिक यांच्या गोठ्यात असलेल्या गायीच्या दिशेने आला, यावेळी गायीवर बिबट्या हल्ला करणार तोच गायीने बिबट्याला जोराची धडक मारली,यानंतर हा बिबट्या हरिश्चंद्र आदिक यांच्या घराच्या आडोशाला येऊन बसला.त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली, त्यानंतर सकाळी सदर बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.तपासणीसाठी व पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आले होते त्यांनंतर तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याला नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
खानापूर परिसरात गेल्या महिन्याभरात अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच आता सुगीचे दिवस आहे मात्र बिबट्याच्या भितीने शेतकरी शेतात जाण्यास धजत नाही तर अनेकांनी शेतीचे राञीचे कामे बंद केली आहे.तरी देखील या परिसरात वनविभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

खानापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री शेतामध्ये जाताना सावधानता बाळगावी असे आवाहन पोलीस पाटील संजय आदिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here