श्रीरामपूर : खानापूर परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येथील परिसरातील एकाच दिवशी वस्तीवरील अनेक व्यक्तींना पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्यामूळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्यांची झुंज झाली होती,या नर जातीच्या बिबट्याच्या झुंजीत एक बिबट्या गंभीर जखमी झाला होता.
या जखमी बिबट्याला शनिवारी वनविभागाने जेरबंद करून श्रीरामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले असता बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामूळे उपचारासाठी नगरला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दिली मात्र त्यानंतर सदर बिबट्याला राहुरी येथील रोपवाटिका येथे पाठविण्यात आले आहे.
मात्र, दोन बिबट्याची झुंज झाल्याने एक बिबट्या जवळच असल्या उसाच्या शेतात पसार झाला होता.एकंदरीत घटना ताजी असताना शनिवारी सायंकाळी पुन्हा सहाच्या वाजताच्या सुमारास उसामध्ये दबा धरून बसलेला बिबट्या पुन्हा बाहेर आल्यामुळे शेतकर्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये देखील एकच खळबळ उडाली आहे.
या परिसरात काल दि.२७ रोजी सायंकाळी पिंजरा लावण्यात आला असून वनविभागाने आणखी पिंजरे खानापूर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट : खानापूर परिसरात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. काल एक बिबट्या जेरबंद करण्यात आला असला, तरी देखील एक बिबट्या अद्याप पर्यत मोकाटच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन खानापूरचे पोलीस पाटील संजय आदिक यांनी केले आहे.
चौकट : श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी व वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून तातडीने पिंजरा उपलब्ध करून खानापूर येथे पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानुसार वनविभागाकडुन पिंजरा लावण्यात आला आहे.