श्रीरामपूर/प्रतिनिधी (संदिप आसने) :- खानापूर येथे दोन बिबट्यांच्या भांडणात जखमी झालेल्या बिबट्याचा काल रात्री राहुरी येथील रोपवाटिकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसापासून बिबट्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे शनिवार दि.२६ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्यांची झुंज झाली आणि त्यामध्ये एक बिबट्या गंभीर जखमी झाला होता. या गंभीर जखमी बिबट्याला शनिवारी सकाळी वनविभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी,सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे,वनक्षेञपाल पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी.एस.गाढे,श्री एस.एम.लांडे,श्री बी. बी.सुराशे यांनी ताब्यात घेऊन श्रीरामपूर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले होते, मात्र तेथे उपचार करून देखील त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी बिबट्याला नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविले होते,परंतु सदर बिबट्याला राहुरी येथील रोपवाटिकेत पाठवून तेथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले परंतु तेथे उपचार सुरू असतानाच काल दि.२७ रोजी रात्री सदर बिबट्या मृत्यू झाला.
काल दि.२८ रोजी दुपारी सदर बिबट्याचे राहुरी येथे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे,सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here