श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरातील बेलापूर रोडवरील श्रीरामपूर खरेदी विक्री संघाचे कार्यालय वादाच्या भोवर्‍यात सापडले असून आ. लहु कानडे यांनी

करार करून आपल्या जनसंपर्क कार्यालयासाठी ताबा घेतला आहे. सत्तेचा गैरवापर करून हा ताबा घेतल्याचा आरोप खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेश मुदगुले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर येथील उपनिबंधक कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.

श्रीरामपूर देखरेख संघाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर देखरेख संघाचे कार्यालय आहे. देखरेख संघाचे चेअरमन इंद्रनाथ थोरात व सचिव जे.बी.नरसाळे यांनी करार करून या इमारतीमधील तळमजल्यातील 1 रूम भाडे कराराने दिलेला होता.

या कार्यालयात संस्थेचे दप्तर तसेच रेकॉर्ड, डेड स्टॉक आणि नेत्यांचे फोटो त्या रूममध्ये ठेवलेले होते. त्या रूमला कुलूप लावलेले होते. संस्थेचे कामकाज या ठिकाणावरून करण्यात येत आहे. असे असतानाही थोरात आणि नरसाळे यांनी आ. लहु कानडे यांच्याशी लिव्ह अ‍ॅण्ड लायसेन्सी करार केला.

संघाच्या इमारतीच्या खालची जागा आ. कानडे यांच्या संपर्क कार्यालयास पाच वर्षांसाठी कराराने देण्यात आलेली आहे, असा आरोप मुदगुले यांनी केला आहे.

मला कायदा कळतो आ. लहु कानडे

खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सामान नव्हते. रिकामी रूम आम्हाला दाखविण्यात आली. त्यानंतर आम्ही करार करून तो दुय्यम निबंधकांकडे नोंदविला. भाडेकरू म्हणून या जागेत माझी एन्ट्री झाली आहे. त्यामुळे कायदा मोडण्याचा संबंध नाही. कायदे मंडळाचा मी सदस्य आहे. मला कायदा कळतो. मी अनेक वर्षे अधिकारी म्हणून राहिलेलो आहे.कुणाला तक्रारी करायच्या त्या कराव्यात असे आ. लहु कानडे यांनी स्पष्ट केले.

इंद्रनाथ थोरातांविरोधात पोलिसांत तक्रार

इंद्रनाथ थोरात व जे.बी. नरसाळे यांनी संस्थेच्या कार्यालयाचे कुलूप बेकायदेशीरपणे तोडले. त्यातील सामान, दप्तर, रेकॉर्ड, डेड स्टॉक, संस्थेच्या खुर्च्या चोरून नेलेल्या आहे व अनधिकाराने घुसून ताबा घेतलेला आहे तरी या इसमांविरूध्द कारवाई करावी,अशी तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असल्याचे गणेश मुदगुले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here