श्रीरामपुर(प्रतिनिधी) :- अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्याला वरदान ठरलेली भंडारदरा व निळवंडे ही दोन्हीही धरणे दिवाळी दरम्यान काठोकाठ भरलेली असताना लाभधारक शेतकऱ्यांना पुरेशी ‘आवर्तने’ मिळणार ही वस्तुस्थिती असली तरी सहा महिन्यांपासून बंद असलेल्या चाऱ्यांची अतिवृष्टीमुळे दयनीय अवस्था झाली आहे म्हणूनच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी पुरेशा क्षमतेने मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाने चाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी कॉंग्रेसच्या श्रीरामपूर पंचायत समिती च्या सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार लहू कानडे यांना पाठविलेल्या निवेदनात डॉ. मुरकुटे यांनी म्हटले आहे की, भंडारदरा व निळवंडे ही दिन्हीही धरणे अकोले,संगमनेर, राहता, श्रीरामपूर, नेवासा या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचप्राण आहेत. निसर्गाच्या व वरुणराजाच्या कृपेने दोन्हीही धरणे काठोकाठ भरली असून दीर्घकाळ पाऊस चालल्याने धरणे जशीच्या तशी भरलेली आहेत त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना पुरेशी आवर्तने मिळतील यात शंका नाही. मात्र कालव्यापासून चाऱ्या व पोटचाऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. आधीच नादुरुस्त असलेल्या चाऱ्यात अतिवृष्टीने झाडेझुडपे वाढली आहे त्यामुळे कालव्याचे पाणी टेलपर्यंत येण्यात अडचणी येणार आहेत. नेहमीप्रमाणे ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याची’ सवय असलेल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी वेळीच चाऱ्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करावेत. स्वतः पाठपुरावा करून या प्रस्तावांना वरिष्ठांची मंजुरी घ्यावी. निधीची तरतूद करावी व दसऱ्यापूर्वी चाऱ्यांची योग्य तर्हेने दुरुस्ती करावी म्हणजे ऐनवेळी गडबडघाई होणार नाही. पाणी सुटल्यावर जेसीबी आणून घाईगडबडीने, थातूरमातूर दुरुस्ती करण्यापेक्षा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेवून चाऱ्यांची दुरुस्तीची कामे चांगल्यारितीने करावीत असेही डॉ. मुरकुटे यांनी म्हटले आहे.

लाभधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणाऱ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या या प्रश्नात हलगर्जीपणा केल्यास आपण आ. लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली लाभधारक शेतकऱ्यांसह जलसंपदा मंत्र्याची भेट घेवून हा प्रश्न धसास लावू असेही डॉ. मुरकुटे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here