आढावा बैठकामुळे महसूल अधिकारी भेटेनात; कामे रखडल्याने जनतेत नाराजीचे वातावरण

अहमदनगर/प्रतिनिधी :- नगर तालुका प्रशासनाचा कणा समजले जाणारे तहसीलदार आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना जनतेला वेळ देता येत नाही. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणीसाठी जाता येत नाही. एखाद्या चांगला उपक्रम राबवता येत नाही. अधिकारी भेटत नसल्याने जनतेच्या मनातील असंतोष वाढला असून, या बैठकांचे गुऱ्हाळ थांबवण्याची मागणी आता जनतेतूनच पुढे येत आहे.

कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. अनेक कार्यालये अनेक दिवस बंद होते. मागील काही दिवसांपासून प्रशासकीय ‘कामकाज रुळावर येत आहे. जनतेची रखडलेल्या कामासाठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही सुरळीत झाली नाही. तालुक्‍याच्या ठिकाणी जर यायचं म्हटलं, तर खासगी वाहन किंवा कुणाच्यातरी वाहनावर बसण्यासाठी मिनतवार्‍या करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तहसील कार्यालयात आल्यानंतर दिवसदिवस थांबूनही तहसीलदार भेटत नसल्याने सामान्य जनता वैतागली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच इतर लोकोपयोगी व मूलभूत कामांकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळच मिळत नाही. याबाबत तालुका प्रशासनाकडे चौकशी केली असता, आढावा बैठकीची कारणे सांगितली जातात.

आता सामान्य जनतेसाठी अधिकारी उपलब्ध होण्याची, अधिकाऱ्यांना फिल्डवर जाऊन भेटी देण्याची गरज आहे. जनतेच्या लोकोपयोगी कामांमध्ये सध्या आढावा बैठकांचा अडसर निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रखडलेल्या कामासाठी पदरमोड करून तहसील कार्यालयात आल्यानंतर ‘साहेब’च भेटत नाहीत. तासनतास ताटकळत बसावे लागत असल्यामुळे सामान्य जनतेच्या मनातील असंतोष वाढला आहे. दिवस दिवस थांबूनही लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. कामासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीमुळे अनेकदा तहसील कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिगचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येते.

सद्या जिल्हा प्रशासनाकडून आढावा बैठकांचा जणू धडाकाच लावला आहे. आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस तरी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठका होत आहेत. एक आढावा बैठक किमान दोन ते चार तास चालते या आढावा बैठकीची तयारी करण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच इतर कार्यालयीन स्टाफमधील कर्मचार्‍यांना किमान दोन ते चार तास तयारीसाठी द्यावे लागतात. आठवड्यातून किमान पंधरा ते वीस तास या आढावा बैठकीतसाठी जातात. यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना जनतेला वेळ देता येत नाही. विशेष म्हणजे सध्याच्या काळात आरोग्य समस्यांची पाहणी, अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करून उपाययोजना करण्याची गरज आहे परंतु तहसीलदारांना या बैठकांचे जंजाळातून बाहेर पडता येईना. कर्मचारीही सुस्तावले सारखे झाले आहेत.याबाबत प्रशासनातील काही घटकांकडून धक्कादायक माहिती पुढे आली. एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यावर्षी २३ मार्चपासून आम्ही अद्यापि सुट्टी घेतली नाही. सुट्टीच्या दिवशीही कामावर येतो. संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे हे आईच्या अंत्यविधीनंतर दुसर्‍या दिवशी ‘कामावर हजर झाले. नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कर्तव्य पार पाडण्यासाठी व्हॉट्सअप कॉलिंग करून आजीचे अंत्यदर्शन घेतले. कोणीही कर्मचारी आजारी पडले तरीही आम्हाला कामावर यावेच लागते. रोजच्या ताणतणावामुळे मनस्थिती बिघडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here