श्रीरामपूर :- ज्या बुथप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुख यांनी राजीनामा दिल्याचे नाट्य रंगवले गेले त्यांची नियुक्ती फक्त कार्यविस्तार योजनेअंतर्गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी केली होती. त्यांची मुदत संपलेली आहेच. आता नवीन निवडी झाल्या असून 232 बुथ प्रमुखांच्या निवडी झाल्या असल्याने त्यांच्या राजीनाम्याला फारसे महत्त्व नाही. स्वतःचे पद अबाधित ठेवायचे अन् इतरांना राजीनामे द्यायला लावायचे त्यापेक्षा त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा मग बोलावे, अशी मागणी भाजपच्या अनेक पदाधिकार्‍यांनी भाजपा संचलन समितीच्या पदाधिकार्‍यांवर केली आहे.


श्रीरामपूर तालुक्यातील भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवडी वादात सापडल्या असून आपल्याला विश्वासात न घेता पदाधिकारी नियुक्त केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील अनेक बूथ प्रमुखांनी व शक्ती केंद्राध्यक्षांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन श्रीरामपूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी संचलन समिती स्थापन केली.


त्यावेळी काही थोडक्या नेत्यांनी श्रीरामपुरात मेळावा घेऊन दाखवावा, असे आव्हान दिले होते. ते आव्हान स्विकारत या नवनियुक्त भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी मातोश्री मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून तो यशस्वी करून आपली ताकदही दाखवून दिली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शशिकांत कडूस्कर होते.


यावेळी तालुकाध्यक्ष बबन मुठे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, नगरसेविका भारती कांबळे, सुनील वाणी, गणेश राठी, मीना राठी, अनिल भनगडे, रामभाऊ तरस व सतीश हारगुडे , सतीश सौदागर, मिलिंद साळवे, विठ्ठल राऊत, शंतनू फोपसे, बंडूकुमार शिंदे जाफराबादचे सरपंच संदीप शेलार, अरुण धर्माधिकारी, रुपाली धुमाळ, अक्षय वर्पे, विशाल अंभोरे, विशाल यादव, पल्लवी लोंढे, अंजली सौदागर, अर्पणा वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिल भनगडे, सुनील वाणी, नगरसेविका भारती कांबळे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे यांनी प्रकाश चित्ते व किरण लुणिया यांचे नाव न घेता टीका केली. त्यांनी इतरांना राजीनामे द्यायला लावले अन स्वतःचे पद अबाधित ठेवले आहे. अशी टीका करून त्यांनी राजीनामा द्यावा मग बोलावे. सुनील वाणी म्हणाले, जे म्हणतात आपण पक्ष वाढवला त्यांना स्वतःला साधे निवडून येता आले नाही अशी टीका केली.

शहराध्यक्ष मारुती बिंगले म्हणाले, बुथ प्रमुखांना फसवून सह्या घेतल्या व राजीनामे जाहीर केले. पदाधिकार्‍यांच्या निवडी प्रदेशावरून झाल्या त्या फक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जाहीर केल्या त्यात त्यांची चूक नाही. संघटन मंत्र्याला संघटन मंत्रीच म्हणावे लागेल.

नगरसेविका भारती कांबळे म्हणाल्या स्वीकृत नगरसेवक कसा घेतला हे सर्वांना माहीत आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या योगदानातून भाजपाचे संघटन राहून या तालुक्यात भाजपा सुस्थितीत आहे. काहींच्या मी पणामुळे मागील काही काळ भाजपा मागे राहिली होती.

तालुकाध्यक्ष बबन मुठे म्हणाले, ज्यांनी संचलन समिती स्थापन करून काम करण्याची तयारी दाखवली त्या समितीच्या अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असून त्याचवेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी त्यास भाजपातून निलंबित केले आहे.

अनिल भनगडे म्हणाले, 18-20 कार्यकर्ते घेऊन तालुक्याची जबाबदारी घेऊन काम कसे करणार अशी चिंता वाटणार्‍यांना या मेळाव्यातून सडेतोड असे उत्तर दिले आहे.

गणेश राठी म्हणाले, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी मनमानी पध्दतीने निवडी केल्याचा जो आरोप केला तो निखालस खोटा आहे. कोणत्याही निवडी नियमबाह्य करण्यात आलेल्या नाहीत, असा खुलासा यावेळी करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष शशिकांत कडुस्कर म्हणाले, भाजपा हा पक्ष आचार, विचार आणि संस्काराचा पक्ष आहे. पक्षाची आजची ही ताकद पाहून खरोखरच श्रीरामपुरात भविष्यात भाजपाला चांगले दिवस येणार असल्याचेही सांगितले.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बबन मुठे यांनी केेले तर विशाल यादव, विठ्ठल राऊत, अक्षय वर्पे यांची भाषणे झाली. आभार सतीश सौदागर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here