कोपरगाव/प्रतिनिधी (संजय भारती) :- तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यातून ‘ब’ यादीतील पात्र लाभार्थ्यांना १३३३ घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांचे कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत स्तरावर महाआवास अभियानाचे आयोजन केले असून या अभियानाचा ‘ब’ यादीतील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सभापती सौ. पोर्णिमा जगधने व उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केले आहे.
२०२२ पर्यंत स्वत:चे घर नसलेल्या सर्वच नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. २० नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय आवास दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण भागात गृहनिर्माणाचे काम गतीमान करणे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे हा यामागील उद्देश आहे. या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधत महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत स्तरावर २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १०० दिवसीय महाआवास अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ‘ब’ गटाच्या घरकुल लाभार्थी यादीतील पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची एकाच वेळी पूर्तता करून घेण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच प्रथम हफ्ता वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे नियोजन या अभियानातून केले जाणार आहे. हे अभियान ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे मार्फत राबविले जाणार असून यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. गरजू पात्र लाभार्थ्यांना सहजपणे घरकुलाचा लाभ मिळावा व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये येण्याची गरज भासू नये हा महाविकास आघाडी सरकार व पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा उद्देश आहे. सर्व लाभार्थ्यांची एकाचवेळी कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी हे अभियान राबविले जात असून ब’ यादीतील पात्र लाभार्थ्यांनि या अभियानाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सभापती सौ. पोर्णिमा जगधने व उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here