श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- एकेकाळी महाराष्ट्रात नावाजलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रशासन सध्या कमालीची अस्थिर झाले असून गेल्या चार वर्षात सहा मुख्याधिकारी पालिकेने पाहिले. त्यामुळे शहराची मात्र मोठी दुर्दशा झाली असून सर्वच प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक मात्र एकमेकांवर आरोप करण्यात मग्न आहेत. त्यामुळे नागरिकांना मात्र नागरी समस्यांचे प्रश्न मांडायचे कुणाकडं आणि ते सोडवायचे कोणी असा प्रश्न पडला. चार वर्षापूर्वी पालिकेची निवडणूक होऊन माजी आमदार जयंत ससाणे यांची एक हुकमी सत्ता संपुष्टात येऊन अनुराधा आदिक या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आल्या. त्याचबरोबर त्यांच्या गटाचे दहा नगरसेवक निवडून आले. ससाणे गटाचे 22 नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यातून अंजुम शेख गटाने वेगळा सवता सुभा निर्माण करून दहा नगरसेवक वेगळे झाले.त्यांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना पाठिंबा दिला त्यामुळे आदिक गटाची सत्ता नगरपालिकेत सत्तारूढ झाली. नगरपालिकेत चार वर्षा पूर्वी सत्तांतर झाले त्या वेळी मुख्याधिकारी म्हणून सुमंत मोरे हे काम पहात होते. सत्तांतर झाल्यामुळे मोरे साहेबांना काम करण्यात मोठ्या अडचणी आल्या. परंतु त्यांनी आपला कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या काळातील भुयारी गटार घोटाळा प्रकरणातील ते एक आरोपी आहेत.त्यांच्यानंतर डॉ. बाबुराव बिक्कड हे मुख्याधिकारी म्हणून लाभले. परंतु दीड वर्षातच त्यांची बदली झाली. त्यांच्यानंतर बारिंद्रकुमार गावित यांनी मुख्याधिकारी पदार्थ चार्ज घेतला. पण माजलगाव येथील भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ते निलंबित झाल्याने कार्यमुक्त झाले. त्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नेवाशाचे तत्कालीन मुख्याधिकारी समीर शेख यांनी सहा महिने कामकाज पाहिले. आता त्यांच्या जागी ज्ञानेशवर ढेरे हे मुख्याधिकारी म्हणून भंडा-याहून श्रीरामपूरला नुकतेच बदलून आले.मात्र ढेरे हे आल्यापासूनच पालिकेत वादग्रस्त ठरले आहेत . विशेषतः नगराध्यक्षा आणि त्यांचं कामकाजाबाबत एकमत होत नसल्याने दोघातील मतभेद वारंवार चव्हाट्यावर आले .त्याची परिणीती म्हणून गेल्या आठवड्यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून नगराध्यक्षांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश दिल्यामुळे सध्या ते रजेवर गेले आहेत. ते आता परत हजर होण्याची शक्यता खूप कमी आहे . सध्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे .अशा पद्धतीने गेल्या चार वर्षांमध्ये मोरे, बिक्कड,गावित,शेख,ढेरे आणि आता डोईफोडे असे सहा मुख्याधिकारी पालिकेत कामकाज करून गेले आहेत. नगरपालिकेमध्ये कोणत्याच गटाला बहुमत नसल्याने दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. एखादा निर्णय घेतला गेला तर त्याला दुसरा गट विरोध करतो आणि या परस्परविरोधी गटांना तोंड देण्याची वेळ मुख्याधिकाऱ्यांवर येते. ससाणे यांच्या काळात एकाच गटाची सत्ता असल्यामुळे मुख्याधिकारी सुद्धा पदाधिकाऱ्यांचा मान ठेवीत होते आता मात्र तसे दिसत नाही. मुख्याधिकारी ढेरे यांना कोणाचे आशीर्वाद आहेत हा सुद्धा शहरांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या सर्वांचा परिणाम शहरातील विकास कार्यावर झाला आहे. सर्वच रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. आरोग्याचा प्रश्न प्रत्येक भागामध्ये निर्माण झाला आहे. पालिकेतील कर्मचारी सामान्य नागरिकांच्या तक्रारी असं ऐकत नाही. नगरसेवकाने फोन केल्याशिवाय कचऱ्याची गाडी कचरा उचलायला येत नाही. अशा सर्वच भागातील तक्रारी आहेत. एकूणच अस्थिर प्रशासनाचा परिणाम शहराच्या नागरी समस्या वाढण्यावर झाला असून नगरपालिकेला सक्षम मुख्याधिकारी लाभतील का ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here