श्रीरामपूर/प्रतिनिधी :- अशोकच्या कार्यक्षेत्रात यंदा गळीत क्षमतेपेक्षा जास्ती ऊस असून निसर्गाच्या अनुकूलतेमुळे ऊसाची प्रतवारीही चांगली आहे. यावर्षी बरे दिवस येतील अशी सभासदांची भावना आहे. अशोकचे व्यवस्थापन मात्र एकीकडे कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस बाहेरच्या कारखान्यांना देत आहे व दुसरीकडे कार्यक्षेत्राबाहेरून कोवळा ऊस आणून सभासदांच्या ऊसाच्या खोडक्या करत आहे. अशोकचे संयमी सभासद या विकृत नियोजनाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी दिला आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात डॉ. वंदना मुरकुटे यांनी म्हटले आहे की, या गळीत हंगामात कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस असल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने ऊस बाहेरच्या कारखान्यांना देण्याचा निर्णय घेतला मग एकीकडे कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस बाहेरच्या कारखान्यांना जास्त असतानाच कार्यक्षेत्राबाहेरून निकृष्ट ऊस कशासाठी आणला जातोय. बाहेरून आणलेल्या या ऊसात कोवळ्या उसाचे अधिक प्रमाण असून सभासदांची चांगल्या प्रकारची ‘आडसाली’ पिके गाळपाविना शेतात उभी असताना बाहेरचे ‘खोडवे’ गळीतासाठी आणले जात असल्याने अशोकच्या कार्यक्षेत्रातील हार्वेस्टिंगचे नियोजन कोलमडले आहे. सभासदांचे परिपक्व असलेले ऊस गाळपाविना शेतातच उभे असून पांक्षा फुटल्याने वजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अठरा महिने रात्रंदिवस काबाडकष्ट करून जोपासलेल्या पिकांना तोडी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजी निर्माण झाली आहे.

कोलमडलेले हार्वेस्टिंग वेळीच दुरुस्त करून कार्यक्षेत्रातील ऊस तोडींना गती मिळावी व कारखान्याचा सभासद हाच कारखान्याचा खरा मालक आहे याची जाणीव ठेवून कार्यक्षेत्रातील ऊसतोडीला प्राधान्य द्यावे व सभासदांचे नुकसान टाळावे असेही डॉ.मुरकुटे यांनी म्हटले आहे.

अशोकचे व्यवस्थापन नेहमी उत्कृष्ट नियोजनाच गवगवा करते मग तीन टन ऊसाच्या बैलगाड्या रस्त्यावरील खड्ड्यात फसल्यानंतर मुरूम – माती टाकायला सुरुवात करणारे हे नियोजन उत्कृष्ट कसे असू शकेल असा सवाल उपस्थित करून डॉ. मुरकुटे यांनी सभासदांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सभासदांनी पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या ऊसाच्या खोडक्या करून सभासदांचे नुकसान करू नका, शेतकी विभागाला सक्रीय बनवा, ऊसतोडीला वेग द्या, अश्या सूचनाही कारखाना व्यवस्थापनाला केल्या आहेत. मध्यंतरीच्या अतिवृष्टी व वादळामुळे पडलेल्या ऊसाकडेही कारखाना व्यवस्थापनाने लक्ष दिले नाही. कार्यक्षेत्रातील ऊसावर रोग पडला तेव्हाही ‘हवाई फवारणी’ करून ऊस उत्पादकांना दिलासा दिला नाही व आताही उसतोडीला उशीर करून ऊस उत्पादकांची असेहोलपट केली जात आहे.

आपण कसेही वागलो तरी काही बिघडत नाही अशा थाटात कारखान्याचा कारभार चालू असून योग्य वेळी कारखान्याचे सुज्ञ सभासद व्यवस्थापनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत असे निवेदनात म्हटले आहे.

 

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here