श्रीरामपूर(प्रतिनिधी)- शहरातील पूर्णवादनगर परिसरातील चराच्या पलीकडील नागरी वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत पूर्णवादनगर चराच्या पलीकडील लोकवस्तीमधील अनेक कुटुंबांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट झालेली आहे. मात्र नगररचना विभागातील काही त्रुटींमुळे लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. नगरपालिकेकडून बांधकाम परवाने मिळत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी ही बाब जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका स्नेहल खोरे व केतन खोरे यांच्या निदर्शनास आणून दिली. खोरे यांनी नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची विस्तृत माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाने नवीन परिपत्रकानुसार १५० चौरस मीटरपर्यंत भूखंड धारकांना बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. स्वमालकीची जागा असतानाही सुस्त प्रशासनामुळे या परिसरातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याचे केतन खोरे यांनी निदर्शनास आणून दिल्याने ना.तनपुरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य कार्यवाहीची आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here