जमिनीच्या वादातून डोक्यात लोखंडी हत्यार मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राहता/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात तिसगांव प्रवरा इथं एका तरुणाची जमिनीच्या वादातून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गौरव अनिल कडू असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

राहाता तालुक्यातील लोहगाव हद्दीत जमिनीच्या वादातून डोक्यात लोखंडी हत्यार मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीची घटना 31 डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती.

नगर मनमाड महामार्गावर हॉटेल ग्रीनपार्क समोरील शेतजमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. असं असताना आरोपी अमोल दिलीप नेहे, किशोर लहाणू नेहे, वसंत लहाणू नेहे, सुरेश लहाणू नेहे आणि सचिन वसंत नेहे यांनी दहशतीच्या जोरावर शेतात नांगरणी सुरू केली. मयत तरुण व त्याचा भाऊ किशोर तिथे गेले असता आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

गौरवच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी तत्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र 2 जानेवारी रोजी उपचारादरम्यान गौरवचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर लोणी पोलीस ठाण्यात अगोदर 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र एकाचा मृत्यू झाल्याने आता 302 अन्वये गुन्हा दाखल झाला असून पाचही आरोपींना गजाआड करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here