बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जन्म : पोंभुर्ले,महाराष्ट्र, ६ जानेवारी १८१२; मृत्यू : मुंबई, १८ मे १८४६) हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.
बाळशास्त्री जांभेकर
जन्म : ६ जानेवारी, १८१२
पोंभुर्ले, महाराष्ट्र
मृत्यू : १८ मे १८४६
पेशा : पत्रकारिता, साहित्य
प्रसिद्ध कामे : दर्पण
मुळगाव : पोंभुर्ले (देवगड तालुका,सिंधुदुर्ग)
वडील : गंगाधरशास्त्री

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
विश्वविख्यात माध्यमतज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे की, वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसार जवळपास १८३ वर्षापूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्याची महती सांगणारा हा लेख.
अर्थातच १८३२ चा काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता आणि या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘ दर्पण’ या पाक्षिकाची सुरूवात मुंबई येथे करुन मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटविली. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू ‘दर्पण’ साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ तील मजकुराचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता.
त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करुन घेतला आणि समाजप्रबोधनासाठी दर्पणची ठिणगी तेवत ठेवली. २५ जून १८४० साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे मासिक इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले.

संकलन : पत्रकार संदिप आसने मो.९६७३२२०६३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here