जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागणी

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची चाळण झालेली असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्व नगरपालिकांना अतिरिक्त निधी देऊन रस्त्यांची कामे मार्गी लावावीत अशी मागणी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. स्नेहल केतन खोरे यांनी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, राहुरी, संगमनेर, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर या नगरपालिका हद्दीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीकडून नगरपालिकांना निधीही कमी प्रमाणात देण्यात येत आहे. त्यामुळे नगरपालिका हद्दीतील अनेक मुख्य रस्त्यांची दैना अवस्था झालेली आहे. श्रीरामपूर शहरातील नागरिकांना तर अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे अनेक विकास कामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे वर्षभर सर्वत्र विकासकामे प्रलंबित राहिली. मात्र आता सगळे सुरळीत सुरू होत असल्याने श्रीरामपूर नगरपालिकेसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना अतिरिक्त निधी देऊन ही कामे मार्गी लावता येतील अशी मागणी खोरे, भोस यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
आपण केलेल्या मागणीची पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब यांनी गांभीर्याने दखल घेत श्रीरामपूरसह जिल्ह्यातील नगरपालिकांना लवकरात लवकर शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here