कोरोना महामारी नंतर भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ होत आहे. येत्या पाच फेब्रुवारी पासून भारत व इंग्लंड यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चिन्नास्वामी ( चेपॉक ) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याबरोबरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट विना प्रेक्षक खेळविण्याचा किस्सा घडणार आहे.

या दोन संघातील मालिकेपूर्वी भारत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात तर इंग्लंड श्रीलंकेत श्रीलंकेवर मात करून आल्यामुळे त्यांचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असणार ? यात कुठलेही दुमत असणे शक्य नाही. इंग्लंड तुनलनेने कमकुवत श्रीलंकेला लोळवून आला आहे तर भारताच्या जखमी व नवोदितांच्या संघाने बलाढय कांगारूंना त्यांच्याच भूमित आश्चर्यकारकरित्या हरवून इतिहास घडविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या दोन संघात लढत होत असून भारतात भारताचा संघ गेली आठ वर्ष अपराजित आहे. शिवाय भारताचे जखमी झालेले बरेचसे शिलेदार परत आल्याने भारताची बाजू वरचढ गणली जाते. अनेक क्रिकेट पंडितांनी भारतालाच या मालिकेचा विजेता गृहीत धरले आहे. परंतु क्रिकेट हा मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे, कागदावर नाही. प्रत्यक्ष सामन्यात जो संघ सरस खेळ करेल तोच बाजी मारेल. हे आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जवळून अनुभवले आहे.

भारताचा संघ मायदेशात खेळत आहे. भारतीयांना फिरकीला पोषक खेळपट्टीवर खेळण्याची सवय आहे. शिवाय भारताची फिरकी इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांपेक्षा उजवी आहे. त्याचबरोबर परदेशी संघाना भारतात भारतीय फिरकी मारा खेळण्याचा अनुभव कमी पडतो. त्यामुळे येथे भारताला वरचढ मानले जाते. परंतु बरेचसे क्रिकेट पंडित एक बाब साफ विसरलेले दिसतात की, अनेक परदेशी नवोदित फिरकी गोलंदाजांनीही कसलेल्या भारतीय फलंदाजांची भंबेरी उडविली आहे. त्याला इतिहासही साक्षीला आहे. त्यामुळे सध्याच्या भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाज अनुभवात कमी असले तरी ते त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांच्यात वेगळीच उर्मी असणार आहे. त्यामुळे त्यांना कमकुवत समजण्याची चुक भारताला धोकादायक ठरेल. जॅक लिच व डॉम बेस हे नवोदित असले तरी त्यांनी श्रीलंकेत इंग्लंडला २-० असा विजय मिळवून दिला आहे. हे विसरून चालणार नाही. शिवाय इंग्लंडचे फलंदाज कर्णधार ज्यो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर हे चांगले कसलेले फलंदाज असून फिरकी खेळण्यात सराईत आहे. त्यांचे काही फलंदाज नवखे जरी असले तरी भारतीय गोलंदाजांना जशास तसे उत्तर देण्याची क्षमता बाळगून आहेत. शिवाय जेम्स अँडरसन, ख्रिस ब्रॉड व जोफ्रा आर्चर जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर नावाजलेल्या जगविख्यात फलंदाजांना लोळवू शकतात. त्यामुळे रोहीत शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहाणे, के.एल राहुल,रिषभ पंत यांना सत्व परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली फलंदाजीबरोबर फिरकी गोलंदाजीत चांगल्या पैकी यशस्वी ठरलेला आहे. मोईनने यापूर्वी भारतीय फलंदाजांना चांगल्या पैकी सतावले आहे. शिवाय त्याच्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने इंग्लंडमध्ये भारताला धूळ चारल्याचा इतिहास ताजा आहे. त्यामुळे इंग्लंडच्या फिरकी आक्रमणाला कमजोर लेखणं भारताच्या अंगलट येऊ शकतं. इतकंच नाही तर इंग्लंडचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात केलेल्या कामगिरीचा अभ्यास करून आपली रणनिती आखतील.

भारताचे बरेचसे खेळाडू दुखापतीतून सावरून आले असल्यामुळे त्यांच्याकडून शंभर टक्के चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवणेही जरी धाडसाचं ठरेल. शिवाय भारताच नेतृत्व ऑस्ट्रेलियात अजिंक्य राहणेने केले होते तर भारतात विराट कोहली करणार आहे. राहणेच्या व कोहलीच्या नेतृत्व शैलीत जमीन आस्मानाचा फरक असल्याने त्याचा प्रभाव या मालिकेत जाणवणार आहे.


प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य राहाणे, रोहीत शर्मा, शार्दूल ठाकूर, जसप्रित बुमराहा, रविचंद्रन आश्विन, चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघातील बलाढय खेळाडूंचा गट कसा कामगिरी करतो हेही या मालिकेचा निकाल ठरविणार आहे.

लेखक : –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here