कोरोना महामारीचा प्रलय शांत होत असताना भारतात वर्षभरानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात होत असून त्याच पार्श्वभूमिवर इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारतात चार कसोटी, ३ वनडे व ५ टि-२० सामने खेळणार आहेत. त्यापैकी प्रथम चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रूवारी २०२१ पासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडीयमवर सुरूवात होत आहे. कोरोना संक्रमणाचा विचार करता या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत व नंतरचे दोन सामने अहमदाबादमध्ये खेळविले जाणार आहेत. तर पहिला सामना प्रेक्षकांना मैदानात येऊन बघता येणार नाही. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची असून इंग्लंडला मालिकेत कमीत कमी तीन विजय मिळविणे गरजेचे आहे, तर भारताला २-०, ३-०, ३-१ किंवा ४-० असा कोणताही मालिका विजय लॉर्डसवर १८ जून २०२१ रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळण्याचे तिकीट देऊन जाईल.


इंग्रजांचं भारतावर राज्य असताना सन १९३२ मध्ये भारताने आपला पहिला कसोटी दौरा केला तो इंग्लंडचा. लॉर्डसवर झालेल्या त्या एकमेव कसोटीत इंग्लंडने भारतावर १५८ धावांनी विजय मिळविला होता. त्या सामन्यान भारताचं नेतृत्व कर्नल सी.के. नायडू यांनी केले होते.


या पहिल्या ऐतिहासीक कसोटी मालिकेनंतर इंग्लंड भारतात ३ कसोटी मालिका खेळण्यासाठी १९३३ मध्ये भारतात आला. ती मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली होती.


या दरम्यान या दोन्ही संघात कसोटी मालिका नियमीतपणे खेळल्या जात होत्या. परंतु भारताला इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवायला सन १९५२ साल उजेडावे लागले. पाच सामन्यांच्या त्या मालिकेतील पहिले तीन सामने अनिर्णित राहीले. त्यानंतरच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली तर पाचव्या सामन्यात भारताने चमत्कारीक खेळ करत इंग्लंडवर एक डाव व आठ धावांनी विजय मिळवून इंग्लंडविरूद्धचा आपला कसोटी विजय नोंदविला व प्रथमच कसोटी मालिका बरोबरीत सोडविली व आपला आत्मसन्मान राखला.


सन १९६१ मध्ये नरी कॉंट्रॅक्टर यांच्या नेतृत्वात भारताने प्रथमच भारतात इंग्लंडविरुद्ध मालिका विजय मिळविला. पाच सामन्यांच्या त्या मालिकेतील पहिले ३ सामने अनिर्णित राहिल्या नंतर कोलकात्यातील चौथ्या कसोटीत भारताने १८७ धावांनी मोठा विजय मिळविला तर चेन्नईमधील पाचवी कसोटी १२८ धावांनी जिंकून इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकली.

भारताला इंग्लंडमध्ये पहिला मालिका विजय सन १९७१ मध्ये मिळाला. तीन कसोट्यांच्या त्या मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहील्यानंतर अजित वाडेकरांच्या संघाने ओव्हलच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर ४ गडी राखून सनसनाटी विजय मिळवित आंग्ल भूमीवर प्रथमच मालिका विजय मिळविला.

इंग्लिश भूमीमध्ये भारतानेे आजवर १८ कसोटी मालिका खेळल्या असून त्यातील १४ मध्ये पराभव पत्करावा लागला तर ३ मालिका जिंकता आल्या आहेत व एक मालिका बरोबरीत सुटली. या दरम्यान एकूण ६२ सामने खेळले गेले त्यातीत ३४ सामन्यात इंग्लंडच्या तर ७ सामन्यात भारताच्या हाती विजय लागले व २१ सामने निकालाविना संपलेे.

भारतभूमीवर या दोन संघात आजपर्यंत १५ कसोटी मालिका खेळल्या असून त्यातील ७ भारताने व ५ इंग्लंडने जिंकल्या आहेत तर ३ अनिर्णित राहिल्या. या दरम्यान झालेल्या ६० पैकी १९ सामने भारताने, १३ इंग्लंडने जिंकले तर २८ सामन्यांचा निकाल लागला नाही.

या दोन संघात एकूण १२२ कसोटी सामने खेळले गेले आहेत त्यातील ४७ इंग्लंडने, २६ भारताने जिंकले तर ४९ अनिर्णित राहिले आहेत.

लेखक : –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here