श्रीरामपूर :- शहरातील नगररचना अंतिम स्कीम 2 मधील खेळाच्या मैदान व शाळेच्या आरक्षित जागेचे आरक्षण उठविण्याचा ठराव कालच्या सभागृहात नामंजूर करण्यात आला.

तसेच नेहरू भाजी मंडई नुतनीकरण, भाजीमंडईचा निधी कुठे वळवावा, स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पगाराचा विषय, स्टेडियममधील गाळ्यांच्या दुरुस्तीबाबत तसेच सैनिक स्मारकासाठीच्या जागेबाबतच्या विषयावर सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. तसेच शहरातील 4500 लोकांकडे असलेली 15 कोटींची थकबाकी वसुली, विषय पत्रिकेवरील विषय टाळून अन्य विषयावर चालू असलेल्या चर्चेचा विषयही चांगलाच गाजला.

श्रीरामपूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधा आदिक होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह पालिकेतील अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

नगरसेविका प्रणिती चव्हाण यांनी सुरुवातीलाच स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार थकले असून त्यांचे पगार तातडीने करावेत. ठेकेदार पळून गेल्यानंतर तसेच करोनाच्या काळात या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलेले असतानाही त्यांचे पगार करण्यात आले नाही.

यावर मुख्याधिकारी म्हणाले, त्यांचे पगार करण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती त्यांनी ते केले नाही. त्यावर त्यांनी काम तर केले आहे त्यांचा मोबदला त्यांना मिळायला हवा. ठेकेदाराविरुध्द कारवाई करणार होते तीही केली नाही. आपण या कर्मचार्‍यांचे पगार दोन दिवसात केले नाही तर पालिकेसमोर उपोषणास बसू असा इशारा चव्हाण यांनी दिला. यावेळी नगरसेवक दिलीप नागरे, राजेश अलघ, मुजफ्फर शेख यांनी सौ. चव्हाण यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

यावर नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, त्यांचे पगार व्हावे म्हणून जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केली आहे. त्यावर नगरसेवक श्रीनिवास बिहाणी व मुजफ्फर शेख यांनी नगरपालिका फंडातून त्यांचे पगार देण्यात यावे, अशी मागणी केली. खासगी विषयावरुन भारती कांबळे व नगराध्यक्षा यांच्यात पुन्हा वाद झाले. यावर अंजूम शेख, संजय फंड, रवी पाटील म्हणाले, खासगी विषय पालिकेत नको असे सांगितले.

नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी पूर्णवाद नगर परिसरातील नागरिकांच्या स्वतःच्या हक्काच्या जागेत आरक्षण आहे. त्यांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ मिळत नसून गेल्या पंचवीस वर्षांचा हा प्रश्न तातडीने सोडवावा. तसेच नगरपालिकेचे पैसे बुडवून जाणार्‍या ठेकेदारांवर कठोर कार्यवाहीची मागणी केली. पटेल हायस्कुल परिसरातील रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन तीन वर्षे उलटूनही ठेकेदार काम करत नसल्याचे खोरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या सुस्त कारभाराचे वाभाडे काढले.

पालिकेच्या फंडात किती पैसे आहे असे श्रीनिवास बिहाणी यांनी विचारले असता अधिकार्‍यांनी 15 ते 16 लाख रुपये शिल्लक असतील असे मोघम सांगितले. यावर श्री. बिहाणी व अंजूम शेख म्हणाले, आज शहरात 4500 नागरिकांकडे 15 कोटी रुपयांची थकबाकी आहे. याची रोख 4 ते 5 लाख रुपये वसुली होते मग फंडात केवळ 15 ते 16 लाख रुपयेच शिल्लक कसे? असा सवाल केला. सदरची वसुली तातडीने करावी. जे लोक गरीब आहेत त्यांची करोना काळातील घरपट्टी व पाणीपट्टी कमी करावी, अशी मागणी नगरसेविका भारती परदेशी यांनी केली.

स्टेडियममधील गाळ्यांचा लिलावाबाबतच्या विषयावर मुजफ्फर शेख म्हणाले, या ठिकाणच्या गाळ्याचे शटर व खिडक्या चोरीस गेल्या आहेत. याठिकाणी मद्यपि लोक बसतात त्यांचा अटकाव करण्यासाठी गेट बसवावे व गाळ्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली. नगराध्यक्षा म्हणाल्या या ठिकाणी अतिक्रमण झाले असून ते काढून त्या ठिकाणी महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्याची योजना आहे. यावर सौ. हेमा गुलाटी म्हणाल्या, यासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करावी, म्हणजे काम चांगले होईल. या चार वर्षात एकाच विषयावर प्रत्येक मुख्याधिकारी आले त्यावर चर्चा होते परंतु कामे होतच नसल्याचे त्यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील कचरा संकलनासाठी भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा खर्चावर बोलताना भारती कांबळे म्हणाल्या शहरात सर्वत्र कचरा साचला आहे. घर तेथे कचरा असताना त्यावर खर्च का करावा. यावर एका ट्रॅक्टरवर चार कर्मचारी असतात असे अधिकार्‍यांनी सांगताच मुजफ्फर शेख म्हणाले एका ट्रॅक्टरवर चार कर्मचारी नसतातच ते दाखवून द्यावे त्यांचा खर्च का दाखवला जातो. नगरोत्थान योजनेअंतर्गत शिल्लक निधीबाबत श्रीनिवास बिहाणी व संजय फंड म्हणाले, शहरातून घोटी ते गेवराई हा चार पदरी रस्त्याची निविदा निघाली आहे.

तो रस्ता झाला तर अनेक व्यावसायिकांवर अतिक्रमणाचा फटका बसणार आहे. त्यासाठी रिंगरोडचा निधी त्याच ठिकाणी वापरला जावा. तो रस्ता खूपच महत्वाचा आहे. त्यावर हा निधी का पडून आहे? हा निधी दुसरीकडे देण्याचे कारण काय? आपण अतिक्रमण का काढले नाही असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी शामलिंग शिंदे व अंजूम शेख यांच्यात शाब्दीक वाद झाले.

पालिकेच्या नगर रचना योजना क्रमांक 2 प्लॉटचे आरक्षण उठविण्यात यावे या मागणीचा विषय येताच यावर नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, मंगल झंवर यांनी नगर रचना योजना क्रमांक 2 मध्ये फेरबदल करण्यात यावे याबाबत अर्ज केला आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे त्याबाबतचा ठराव पालिकेपुढे ठेवला आहे.

त्यावर दिपक चव्हाण म्हणाले, 30 ते 35 वर्षापासून मोरगे वस्तीरील 90 कुटुंबांवर अन्याय झाला आहे त्यांचे तक्रारी आयुक्तांपर्यंत पाठविले आहे. त्यांच्या रिझर्व्हेशनबाबतही सभागृहात निर्णय घ्यावा. यावर किरण लुणिया म्हणाले, सभागृहाला आरक्षण उठविण्याचे अधिकार आहेत का? असतील तर शहरातील सर्वांनाच न्याय द्या, असे ते म्हणाले.

यावर नगराध्यक्षा म्हणाल्या या मागील काळातील लोकांनी त्यांचे त्यांचे आरक्षण उठविले. काही लोकांवर अन्याय झाला आहे. त्यावर श्री. बिहाणी म्हणाले, ते कायदेशीररित्या न्यायालयातून उठविले आहे. अंजूम शेख म्हणाले, हा व्यावसायिकतेचा भाग आहे. ज्याच्यात दम व ताकद आहे, ज्याची वरपर्यंत पोहोच आहे. त्यांनी कायदेशीररित्या रिझर्व्हेशन उठविले. त्यावेळी आरक्षण उठविण्याच्या विषयाच्या ठराव सभागृहात नामंजूर करण्यात आला.

नेहरु भाजी मार्केट नुतनीकरणासाठी 5 कोटीची मागणी केली होती. पैकी 2 कोटी आले. नेहरु भाजी मार्केटच्या नुतनीकरणासाठी 60 लाख रुपये लागले. मात्र आरक्षणाच्याजागेत भाजी मंडईचे काम करता येत नसल्यामुळे अन्य भागात छोट्या भाजी ंमंडई करण्यासाठी उर्वरीत निधीचा वापर करण्याचा विषय झाला आहे.

यावर राजेश अलघ म्हणाले, एका भागात भाजी मार्केट न बांधता शहरातील सातही वॉर्डात भाजी मार्केट करण्यात यावे. यावर सदरचा निधी हा ओपन थिएटर किंवा प्रियदर्शन मंगल कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी वापरावा असे सुचविले असता, राजेंंद्र पवार म्हणाले, आमच्या भागातील भाजी मार्केटचा निधी कुठेही खर्च करु नये, आमच्या भागात होत असलेली चांगली कामे पहावली जात नाही का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी शहरातील एकूण 72 विकासात्मक कामांना प्रशासकीय मंजुरी मिळावी म्हणून सभागृहापुढे विषय ठेवण्यात आला असता त्यास मंजुरी देण्यात आली.

सैनिक स्मारक जागेवरुन आदिक-ससाणेमध्ये खडाजंगी व निषेध

शहिद स्मारकासाठी जागा मागण्यासाठी आलेल्यांचा पालिकेत अपमान केल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केला असता नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी राजकारण करु नका, खोटे आरोप करू नका, असे ससाणे यांना सुनावले. त्यावर करण ससाणे यांनी माझ्याकडे रेकॉडिंग आहे, असे सभागृहात सांगितले असता नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सभागृहासमोर ते रेकॉडींग ऐकवा, असे आव्हान दिले. त्यावर मी ऐकवतो पण तुम्हाला माफी मागावी लागेल, असा ठेका करण ससाणे यांनी लावून धरला. यावरुन दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जी जागा शहीद स्मारकासाठी मागितली आहे तेथे लहान मुलांसाठी गार्डन करायचे आहे. त्यासाठीची साहित्यही आलेले आहे तेव्हा बेलापूर रोडला प्रशस्त ठिकाणी गावात येताना दिसेल अशा ठिकाणी हे स्मारक उभारावे, असे आपण त्यांना सुचवले. मात्र याबाबत आपण माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचे अनुराधा आदिक यांनी सांगत शहिदांचा आपल्याला आदर आहे. देशाच्या सैनिकांना आपला सलाम आहे. जाणून बुजून कुणीतरी यामागे राजकारण करतय, असे आदिक म्हणाल्या. त्यावर करण ससाणे, दिलीप नागरे यांनी आपण शहिदाचा अपमान केला असे म्हणत निषेध केला. यावेळी प्रकाश ढोकणे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता करण ससाणे यांनी तुम्ही मध्ये कशाला बोलता. तुम्ही उक्ते घेवू नका, नाहीतर वर येवून बोला, असे ससाणे यांनी सुनावले. या विषयावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here