नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- मोहिनीराज मंदिराची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह जगातील अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या नेवासे चे ग्रामदैवत मोहिनीराज यात्रा यावर्षी करोना मुळे होणार नसल्याचे पंचकमिटी व पुजारी बडवे कुटुंबियांनी जाहीर केले आहे. नेवासे शहराचे ग्रामदैवत विष्णूच्या मोहिनी अवताराचे जगातील एकमेव अर्धनारीनटेश्वर मोहनीराजाचे मंदिर आहे.

महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात अनेक ब्राह्मण कुटुंबाचे हे कुलदैवत असल्याने यात्रेच्या पंधरा दिवसात अनेकजण देवाला नवस फेडणे अथवा दर्शनासाठी येत असतात.रथ समाप्तीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे यावर्षी 20 फेब्रुवारी पासून सुरू होणारी यात्रा भागवत कथा किर्तन, पालखी सोहळा, काला यासह पाच दिवसाचे गाव जेवण यासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान लाखो भाविक नेवाशात येत असतात मात्र करोना च्या पार्श्वभूमीवर सदरच्या देवस्थानचे पंच कमिटी व पुजारी बडवे यांनी यावर्षी यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले आहे.
20 फेब्रुवारीपासून मंदिरांमध्ये भागवत संस्कृतसंहिता वाचली जाणार असून यावेळी मंदिरात समयांचा दीपोत्सव सात दिवस होईल.त्यानंतर पाच दिवस मोहिनीराज महाराजांची उत्सवमूर्ती पाच दिवसासाठी पाकशाळेत जाण्याऐवजी मंदिरातच गाभाऱ्यामध्ये ठेवली जाणार आहे.पाच दिवसांनी पुन्हा एकदा विधीवत पूजा होऊन देव मूर्ती मूळ जागी विराजमान होणार आहे.


यावर्षी पालखी सोहळा, काला, पंगती, यात्रा, जाहीर भागवत कथा, कुस्ती हंगामा,कीर्तन,तसेच मंदिरावर नवसाचा झेंडा लावण्यासाठी असलेल्या झेंडा मिरवणुका रद्द करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here