अहमदनगर :- राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट चांगला सुधारला आहे. आता लसीकरण देखील सुरु करण्यात आले असल्याने नागरिक देखील बेभान होऊन नियमांची पायमल्ली करताना दिसत आहे.मात्र राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावताना दिसत आहे. करोना अद्याप गेलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा, अन्यथा पोलीस दंड करणार आहेत.

जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत, तर शिथील करण्यात आलेले नियम कडक करण्यात येतील प्रसंगी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णयही घ्यावा लागेल,’ असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचा संदर्भ देत डॉ. भोसले आणि विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना हे आवाहन केले आहे.


डॉ. भोसले म्हणाले, ‘कमी झालेले करोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. विदर्भ-मराठवाड्यात आकडे लक्षणीयरित्या वाढले आहेत. त्यामुळे मराठवाड्याचा शेजारील जिल्हा म्हणून आपल्या नगर जिल्ह्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता आपण पुन्हा मास्कची सक्ती करणार आहोत. आम्ही पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा.

यासोबतच चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सर्व खासगी डॉक्टरांनी पूर्वीप्रमाणेच लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना चाचणीसाठी पाठवायचे आहे. फेरीवाले, केशकर्तनालय, हॉटेल, भाजी विक्रेते, दुकानदार यांच्या बैठका घेऊन त्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पोलीस, महापालिका, आरोग्य विभाग पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असून त्यांना पूर्वी नेमून दिलेली कामे आणि कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घ्यावी आणि सर्वांनीच नियम पाळावे,’ असे आवाहनही जिल्हाधिकारी भोसले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here