श्रीरामपूर – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीरामपुरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कालपासून दंडात्मक कारवाई सुरू केली.मास्कचे महत्त्व पटवून सांगत प्रबोधनासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.संपूर्ण महाराष्ट्रातच आता करोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाभर मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार काल प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस, पालिका प्रशासन यांनी श्रीरामपुरात नेवासा रोड, मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोडवर रस्त्याने फिरून लोकांना मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली.सर्व अधिकारी रस्त्याने पायी चालत जात होते. एस. टी. बसस्थानकावर जाऊन एसटीतील प्रवाशांना मास्क वापरण्याबाबत यावेळी त्यांनी आग्रह केला. याशिवाय एस. टी. कंट्रोलर यांना तशाप्रकारे प्रवाशांना आवाहन करण्यास सांगितले. तसेच विनामास्कच्या कोणत्याही प्रवाशास एसटी बसमध्ये बसू देऊ नये, अशा सूचना त्यांनी वाहक व चालकांना दिल्या. याशिवाय रस्त्याने विनामास्क जाणार्‍या वाहन चालकांवरही यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील जे दुकानदार मास्क न लावता दुकानात बसलेले दिसले त्यांनाही 100 रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येऊन पुन्हा विनामास्कचे आढळल्यास यापेक्षाही मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी तसेच मास्क न लावणार्‍या वाहन चालकांची धांदल उडाली. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून प्रत्येकाने मास्क वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डिवायएसपी संदीप मिटके, पो.नि सानप, मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here