नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- नेवासा येथे महसूल विजय सप्तपदी अभियानास नेवासा पंचायत समितीमध्ये काल बुधवारी प्रारंभ करण्यात आला. शासनाचे सप्तपदी अभियान हे सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारे असून या अभियानाद्वारे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील उपेक्षित घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यादृष्टीने शासनाचा महसूल विजय सप्तपदी अभियान सर्वसामान्य माणसांसाठी पर्वणीच असल्याचे प्रतिपादन सौ.सुनीताताई गडाख यांनी आज यावेळी बोलताना केले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात काल झालेल्या शुभारंभ प्रसंगी सौ.सुनीताताई गडाख यांच्यासह पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, माजी उपसभापती सौ. राजनंदिनी मंडलिक, कारभारी जावळे, पंचायत समितीचे सदस्य विक्रम चौधरी, रविंद्र शेरकर, बाळासाहेब सोनवणे, सौ.सविता झगरे, कारभारी डफळ, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले महसूल विजय सप्तपदी अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आमचा राहील अशी ग्वाही देत त्यांनी आज अभियान बाबत माहिती दिली.

महसूल विजय सप्तपदी
यावेळी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या २९ जणांना अनुदान धनादेशचे वाटप करण्यात आले तर महावास घरकुल अतिक्रमण नियमितीकरण अंतर्गत ६४ जणांना, तुकडे नियम मोहिमेच्या अंतर्गत १० जणांना, पोट खराबा वर्ग-अ क्षेत्र लागवडी खाली आणण्यासाठी देण्यात आलेल्या आदेश पत्राचे वितरण यावेळी सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना सौ.सुनीताताई गडाख यांनी शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून जनतेचे महत्वाचे जिव्हाळयाचे प्रलंबित प्रश्न हाती घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख यांना धन्यवाद दिले.

महसूल विजय सप्तपदी अभियानाचा लाभ जनतेला घेता यावा यासाठी प्रशासनाने तहसील व पंचायत समितीच्या स्तरावर सक्षम अधिकारी नेमण्यात यावा अशी सूचना केली.लोकांची कामे झाली तर आम्हाला मानसिक समाधान मिळेल यासाठी सक्षम अधिकारी जो कामाचा फॉलअप घेऊन काम तडीस नेईल अभियानासाठी असावा अशी सूचना करत त्यांनी हे अभियान तालुक्यात गतिमान होण्यासाठी अधिकारी व प्रशासन यांनी सतर्क राहून प्रयत्न करावा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन म्हणाले की महसूल विजय सप्तपदी अभियान अंतर्गत शेत रस्त्यांचे अडघळे दूर करणे, पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे, तुकडे नियमित करणे, पोटखराबा क्षेत्राचे लागवडी लायक क्षेत्रात रूपांतर करणे, माजी खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित जमिनी वाटपाबाबत कालबाह्य कार्यक्रम आखूनसामोपचाराने वाटप निर्णय घेण्यात येईल.

जेथे स्मशानभूमीसाठी जागा नाही तेथे सरकारी जमीनीचे ग्रामपंचायत कडे हस्तांतरण करून जागा उपलब्ध करूनदेणे, महा आवास योजनेच्या अंतर्गत स्वतःच्या घरकुलासाठी जमीन उपलब्ध नसल्यास त्यांना जमीन प्रदान करणे तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती देऊन त्यांनी यासाठी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रेवणनाथ पवार यांनी केले. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी आभार मानले.

नेवासा येथे महसूल विजय सप्तपदी अभियानास प्रारंभ.
नेवासा येथे महसूल विजय सप्तपदी अभियान प्रसंगी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या २९ जणांना अनुदान धनादेशचे वाटप तर महावास घरकुल अतिक्रमण नियमितीकरण अंतर्गत ६४ जणांना, तुकडे नियम मोहिमेच्या अंतर्गत १० जणांना, पोट खराबा वर्ग-अ क्षेत्र लागवडी खाली आणण्यासाठी देण्यात आलेल्या आदेश पत्राचे वितरण प्रसंगी सौ.सुनीताताई गडाख, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, गणेश पवार, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here